पदाधिकाऱ्यांसोबत बोलताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही सडकून टीका केली आहे
मागील दोन दिवसांपासून विदर्भ दौऱ्यावर असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे प्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दुसऱ्या दिवशीही केंद्र आणि राज्यातील सत्ताधारी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी शेतकरी प्रश्न, राज्यातील फोडाफोडीचं राजकारण आणि हिंदुत्वावरून उपस्थित केल्या जाणाऱ्या प्रश्नांवरून भाजपवर पलटवार केला.
‘करोनाकाळात मी घरी बसून होतो, मात्र कोणाची घरे फोडली नाहीत. सत्ताधाऱ्यांकडून आमदार विकत घेतले जातात. मात्र त्याच पैशातून कुपोषण मिटवा, तुम्हाला मत विकत घेण्याची गरज पडणार नाही. राजकीय पक्ष चोरण्याचं काम सुरू आहे. आधी शिवसेना चोरण्याचा प्रयत्न झाला आणि आता राष्ट्रवादीही चोरण्याचा प्रयत्न झाला. कारण भाजपचा त्यांच्या कार्यकर्त्यांवर विश्वास नाही,’ असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी केला आहे.
मोदींवरही साधला निशाणा
उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही सडकून टीका केली आहे. ‘नरेंद्र मोदी यांनी नुकताच आपल्या भाषणात राष्ट्रवादीचा भ्रष्टाचारी पक्ष असा उल्लेख केला. मात्र याच राष्ट्रवादीच्या काही लोकांना आता त्यांच्या सरकारमध्ये स्थान दिलं आहे. ज्यांच्यावर ७० हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्यांच्यासोबतच आता यांचे फोटो दिसतील. हिंदुत्व म्हणून आम्ही तुम्हाला वाचवलं होतं. बाळासाहेब ठाकरे हे नाव होतं म्हणून हे वाचले, नाही तर केव्हाच कचऱ्यात गेले असते,’ अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी मोदींवर हल्ला चढवला आहे.
दरम्यान, अमरावतीमध्ये ‘भावी पंतप्रधान’ म्हणून कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांचे फलक लावले आहेत. उद्धव ठाकरे यांच्यासोबत या दौऱ्यात खासदार विनायक राऊत, सचिव मिलिंद नार्वेकर यांची उपस्थिती पाहायला मिळत आहे.