२१ जानेवारी २०२०
ऑनलाइन खाद्य पदार्थ डिलिव्हर करणाऱ्या प्रसिद्ध ‘झोमॅटो’ कंपनीने ‘उबर इट्स इंडिया’ या आपल्या प्रतिस्पर्धी कंपनीला विकत घेतले आहे. या झोमॅटो कंपनीने उबर इट्सचा सुमारे ३५ कोटी डॉलर अर्थात २४८५ कोटी रुपयांना खरेदी केला आहे. यामुळे झोमॅटोमध्ये आता उबरचा केवळ ९.९९ टक्के हिस्साच असणार आहे. कॅब सेवा पुरवणारी‘उबर’ या प्रसिद्ध कंपनीचा खाद्य पदार्थ पुरवणाऱ्या शाखेचा व्यवसाय भारतात चांगला होत नसल्याने कंपनीकडून हा निर्णय घेण्यात आला.
कंपनी मार्केटमध्ये पहिल्या किंवा दुसऱ्या स्थानवर नसेल तर तो व्यवसाय सोडून देणेही उबेरचे धोरण असल्याकारणाने हा निर्णय घेण्यात आला आहे . हे अधिग्रहण केवळ भारतातील उबर इट्ससाठीच असल्याचे उबेर इट्सच्या सूत्रांनी सांगितले जगातील इतर देशांमध्ये उबर इट्स आपली सेवा कायम ठेवणार आहे. हा व्यवहार केवळ उबर इट्ससाठी असून कॅब सेवेसाठी नाही.
इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार, भारतात उबर इट्सच्या कर्मचाऱ्यांना झोमॅटो आपल्यामध्ये सामावून घेणार नाही. त्यामुळे उबर इट्सचे सुमारे १०० एक्झेक्युटिव्हज उबरच्या इतर कंपन्यांमध्ये सामावून घेतले जातील किंवा त्यांना कॉस्ट कटिंगचा सामना करावा लागेल. याबाबत झोमॅटो आणि उबर या कंपनीने कोणतेही स्पष्टीकरण देण्यास नाकारले.
आपल्या कॅब सेवेवर जास्त लक्ष्य देण्यासाठीच उबरने उबर इट्स विकण्याचा निर्णय घेतला आहे. उबरच्या कॅब सेवेने यंदाच्या कॅलेंडर वर्षात २०० शहरांमध्ये सेवेचा विस्तार करण्याचे लक्ष्य ठेवले व यामध्ये आता बाईक सेवेवरही जास्त लक्ष्य केंद्रीत करण्यात येणार आहे.