पुणे : श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात वारकऱ्यांच्या गर्दीचा फायदा घेत भाविकांचे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या दोन महिलांना गुन्हे शाखा युनिट-३च्या पथकाने रंगेहात अटक केली. आरोपींकडून १३ ग्रॅम वजनाचे, सुमारे १ लाख ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र जप्त करण्यात आले असून, या प्रकरणी दिघी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या सूचनेनुसार पालखी सोहळ्यात वारकऱ्यांच्या दागिन्यांच्या चोरीच्या घटना रोखण्यासाठी गुन्हे शाखा युनिट-३चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथके तैनात करण्यात आली होती. ही पथके आळंदीपासून बोपखेल फाट्यापर्यंत पालखीसोबत साध्या वेशात गस्त घालत होती.
दरम्यान, पालखी दर्शनासाठी आलेल्या एका महिला भाविकेच्या गळ्यातील मंगळसूत्र दोन महिलांनी गर्दीचा फायदा घेत हिसकावून चोरी केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पथकातील पोलीस कर्मचारी दिलीप राठोड व स्वप्नील महाले यांनी तात्काळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे यांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही महिलांना घटनास्थळीच ताब्यात घेतले.
चौकशीत आरोपी महिलांपैकी एकीने आपले नाव नयना विष्णू काळे (वय २०, रा. धारेश्वर, छत्रपती संभाजीनगर) असे सांगितले. तिच्याकडून चोरीस गेलेले १३ ग्रॅम वजनाचे, १.५० लाख रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र जप्त करण्यात आले. फिर्यादी सुनीता नारायणराव राऊत (वय ५०, रा. चव्होली फाटा) यांच्या तक्रारीवरून दिघी पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३१९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(४), ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहपोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सांग्राम आवाड तसेच सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) सुदर्शन साईदास राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक सुनील जावळे, पोलीस अंमलदार सुरेखा बोरसे, बाबासाहेब गर्जे, सोमनाथ बोहोडे, दिलीप राठोड, निखिल फापाळे आणि स्वप्नील महाले यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.


