Sunday, June 15, 2025
Homeअर्थविश्वखासगी ट्रॅव्हल्सच्या तिकिटात दिवाळीनिमित्त तिप्पटवाढ ...! प्रवाशांचे निघतंय दिवाळे

खासगी ट्रॅव्हल्सच्या तिकिटात दिवाळीनिमित्त तिप्पटवाढ …! प्रवाशांचे निघतंय दिवाळे

एसटी व रेल्वेच्या गाड्यांचे बुकिंग ‘फुल्ल’ झाल्यामुळे दिवाळीसाठी गावी निघालेल्या प्रवाशांकडून खासगी ट्रॅव्हल्स चालक दुप्पट-तिप्पट तिकीटदर घेत आहेत. या लूटमारीकडे वाहतूक पोलिस व प्रादेशिक परिवहन विभागाने पूर्ण दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.

पुणे शहरात नोकरी, शिक्षणाच्या निमित्ताने राहणाऱ्यांची संख्या मोठी आहे. दिवाळीसाठी बरेचजण गावी जातात. पुण्यात प्रामुख्याने मराठवाडा, विदर्भातील नागरिकांची संख्या मोठी असून, त्यांना घरी जाता यावे, यासाठी एसटी महामंडळाकडून अतिरिक्त बस सोडण्यात आल्या आहेत. एसटी बस, रेल्वेचे दिवाळी अगोदर दोन ते तीन दिवसांचे बुकिंग ‘फुल्ल’ झाले आहे. त्यामुळे प्रवाशांना खासगी ट्रॅव्हल्सचाच पर्याय राहिला आहे. खासगी ट्रॅव्हल्स चालकांकडून दिवाळीच्या अगोदर दोन ते तीन दिवसांपासून तिकीट दरात दुप्पट ते तिप्पट वाढ केल्याचे दिसून येत आहे. खासगी ट्रॅव्हल्स चालकांना नियमानुसार एसटी बसच्या दीडपट तिकीट घेता येते; मात्र त्यांनी दर प्रमाणाबाहेर वाढविले आहेत. त्यामुळे नागरिकांचे प्रवासासाठी हजारो रुपये खर्च होत आहेत. त्यामुळे गावी जावे की नाही, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

प्रवाशांचे हाल

  • मराठवाड्यात प्रामुख्याने लातूर, बीड, उस्मानाबाद, परभणी, नांदेड या भागात जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे.
  • या ठिकाणी जाणाऱ्या स्लिपर खासगी ट्रॅव्हल्सचे तिकीट दुप्पटीपेक्षा जास्त झाल्याचे दिसून येत आहे.
  • २० ऑक्टोबरपासून तिकीट दरात मोठी वाढ झाल्याचे ऑनलाइन बुकिंग करताना दिसत आहे.
  • पुण्यावरून नागपूरला जाण्यासाठी एरवी १७०० ते २००० रुपये तिकीट असते. पण, आता थेट साडेचार ते पाच हजार रुपये तिकीट झाले आहे.

शहरानुसार तिकीटदरांत झालेली वाढ

मार्गाचे नाव आठवड्यापूर्वीचे तिकीट २१ ऑक्टोबरचे दर

पुणे नागपूर १७००-२००० ४५००-५०००

पुणे अमरावती १५००- १८०० ३६००-४५००

पुणे लातूर ८००-१००० १७००-१९००

पुणे नांदेड ८००-१००० २१००-२६९९

पुणे हैदराबाद १००० – १३०० ३०००-३५००

पुणे जळगाव ७०० – ९०० २१००-२६००

पुणे औरंगाबाद ६०० – ९०० १५००- २०००

मी पुण्यात नोकरी करतो. दिवाळीसाठी अमरावतीला गावी जायचे आहे. रेल्वेचे बुकिंग ‘फुल्ल’ आहे. त्यामुळे खासगी ट्रॅव्हल्सने जायचा पर्याय उरला आहे. एरवी दीड हजार रुपयांपर्यंत असलेले ट्रॅव्हल्सचे तिकीट साडेचार ते पाच हजार रुपये झाले आहे. मला व पत्नीला जाण्यासाठी व येण्यासाठी तिकिटासाठी १८ ते २० हजार रुपये खर्च येणार आहे.

  • एक प्रवासी

खासगी ट्रॅव्हल्स चालकांना एसटी महामंडळ बसच्या दीडपट तिकीट घेण्यास नियमानुसार परवानगी आहे. गेल्या काही दिवसांमध्ये ट्रॅव्हल्सची तपासणी केली जात आहे. त्यामध्ये जास्त तिकीट घेतल्याचे आढळून आलेले नाही. जास्त प्रवासी घेतल्यांवर कारवाई केली आहे. जास्त भाडे घेतल्यास प्रवाशांनी आरटीओकडे तक्रार करावी. अशा ट्रॅव्हल्सवर कारवाई केली जाईल.

  • डॉ. संजीव भोर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे
RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments