पिंपरी, पुणे | दि. ३० जून २०२५
माल व प्रवासी वाहतूक व्यवसायिकांवर अन्याय करणाऱ्या “ई-चलन कार्यप्रणाली” विरोधात राज्यभरातील सर्वच प्रमुख वाहतूक संघटनांनी स्व-इच्छेने बेमुदत चक्काजाम आंदोलन पुकारले आहे. हे आंदोलन १ जुलैच्या मध्यरात्री १२ वाजता सुरू होणार असून, राज्यातील ३० पेक्षा जास्त वाहतूक संघटना यामध्ये सहभागी होणार आहेत, अशी माहिती असोसिएशन ऑफ ट्रान्सपोर्टर्स, पुणेचे अध्यक्ष दिलीप देशमुख यांनी दिली.
पिंपरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत देशमुख बोलत होते. यावेळी गौरव कदम (कार्याध्यक्ष), अनिल शर्मा, सुमित धुमाळ, अनुज जैन, विनोद जगजंपी, सतनाम सिंग पन्नू, तेजस ढेरे, प्रमोद भावसार, सुभाष शर्मा, सुभाष धायल आदी पदाधिकारी उपस्थित होते.
ई-चालनामुळे वाढलेले अन्यायकारक दंड
संस्थेचे कार्याध्यक्ष गौरव कदम यांनी सांगितले की, ई-चालन प्रणालीमुळे वाहतूकदारांवर विनाकारण दंड आकारले जात आहेत. अनेकदा चालकांना नोटीस न देता, केवळ फोटोच्या आधारे दंड लावले जातात. दंड वसूल करताना कोणतेही स्पष्ट नियम पालन केले जात नाहीत. त्यामुळे ही प्रणाली रद्द करून पूर्वीचे सर्व दंड माफ करावेत, अशी मागणी त्यांनी केली.
मुंबई आझाद मैदानावर सुरू आहे आमरण उपोषण
या संदर्भात सरकारकडे अनेक वेळा निवेदने देण्यात आली, तरीही दखल घेतली गेली नाही. म्हणूनच १६ जूनपासून मुंबईच्या आझाद मैदानावर वाहतूकदार बचाव कृती समितीचे आमरण उपोषण सुरू आहे. आता तीव्र पातळीवर आंदोलन होणार असून, पुणे, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यातील सर्व वाहतूक व्यवसायिक चक्काजाममध्ये सहभागी होणार आहेत.
मुख्यमंत्री यांनी लक्ष घ्यावे – अनिल शर्मा
संस्थेचे कार्याध्यक्ष अनिल शर्मा यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने लक्ष घालून सकारात्मक निर्णय घ्यावा. अन्यथा, हा चक्काजाम संपूर्ण राज्यात तीव्र होईल आणि सामान्य जनतेला होणाऱ्या त्रासाची जबाबदारी प्रशासन व राज्य सरकारवर असेल.
दुरुस्तीच्या मागण्या:
खजिनदार विनोद जगजंपी यांनी खालील मागण्या स्पष्ट केल्या:
ई-चालन यंत्रणेतील गैरप्रकार थांबवावेत.
अनधिकृत व्यक्तींना मशीन वापरण्यास मज्जाव करावा.
प्रत्येक दंडासोबत अधिकाऱ्याचा फोटो व डिजिटल सही अनिवार्य करावी.
एका वाहनावर एका दिवशी एकच दंड लावावा.
जीपीएसद्वारे कारवाईची पारदर्शकता यावी.
जुने दंड (२०२३ पूर्वीचे) माफ करावेत.
सर्व दंड राज्यात कुठूनही ऑनलाइन भरण्याची सोय असावी.
अधिकृत ट्रक व टेम्पो स्टँडसाठी सरकारने राखून ठेवलेली जागा उपलब्ध करून द्यावी.
रस्ता सुरक्षा समित्यांमध्ये वाहतूकदारांचा समावेश करावा.
आंदोलनात सहभागी संघटना
या आंदोलनात महाराष्ट्रातील प्रमुख संघटना जसे की महाराष्ट्र ट्रक टेम्पो महासंघ, न्हावा शेवा कंटेनर असोसिएशन, बॉम्बे गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशन, महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना, महाराष्ट्र ट्रक ओनर्स असोसिएशन, मुंबई बस वाहतूक महासंघ, शिव औदुंबर प्रतिष्ठान, जय भगवान ट्रान्सपोर्ट, उलवे ट्रान्सपोर्ट असोसिएशन, साकीनाका ट्रक टेम्पो असोसिएशन आदींनी सहभाग जाहीर केला आहे.