बदलत्या काळातील शिक्षण प्रणाली आणि २१व्या शतकातील अत्याधुनिक शिक्षण सुविधा लक्षात घेऊन पिंपरी चिंचवड महानगरपालिका सी.एस.आर सेल अंतर्गत सँडविक कोरोमंट इंडिया यांच्या सामाजिक दायित्व निधी आणि थिंकशार्प फाउंडेशनच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कमला नेहरू हिंदी प्राथमिक विद्यालय शाळा क्र-३ व बालवाडी, पिंपरीनगर मध्ये झालेली संपुर्ण इमारतींची दुरुस्ती, रंगरंगोटी, बोलक्या भिंती, संपूर्ण शाळेला सौरऊर्जा, खेळाचे साहित्य, संगणक प्रशिक्षक व प्रत्येक वर्गामध्ये स्वतंत्र ग्रंथालय इ. सुविधांचे उद्घाटन आयुक्त शेखर सिंह व सँडविक कोरोमंट इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य वित्तीय अधिकारी किरण आचार्य यांच्या हस्ते पार पडले.
या कार्यक्रमास मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी तथा सी.एस.आर प्रमुख निळकंठ पोमण सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात, सी.एस.आर सेलच्या श्रुतिका मुंगी, रोशनी आचार्य, विघ्नेश अय्यर, सँडविक कोरोमंट इंडियाचे अभिजीत चक्रवर्ती तसेच थिंकशार्प फाऊंडेशनचे संस्थापक संतोष फड, वरीष्ठ व्यवस्थापक अमित कुतवळ आदी उपस्थित होते.
आयुक्त शेखर सिंह यांनी सामजिक दायित्व निधीच्या माध्यमातून झालेल्या कामांचा संपूर्ण आढावा घेऊन ग्रीन मॉडेल स्कूलच्या धर्तीवर केलेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले आणि भविष्यात याच अनुषंगाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या इतर शाळांमध्ये महानगरपालिका, सँडविक कोरोमन्ट, इंडिया व थिंकशार्प फाऊंडेशनच्या माध्यमातून एकत्रित शाळा व बालवाडी विकसित करण्याबाबत सकारात्मकता दाखवली. त्याचबरोबर प्रत्येक वर्गात राबविलेला पुस्तक मित्र उपक्रम व टिंकरिंग प्रयोगशाळेचे विशेष कौतुक केले. महानगरपालिकेच्या वतीने गतवर्षी ३८ शाळांमध्ये बालवाडीचे दुरुस्ती काम करण्यात आले आणि यावर्षी अजून ६८ शाळांमध्ये काम करण्याचे नियोजन आखण्यात आले आहे. आज या ठिकाणी ज्याप्रमाणे सँडविक कोरोमंट इंडिया यांच्या सामाजिक दायित्व निधी मधून सर्वसुविधांसह परिपूर्ण बालवाडी तयार झाली आहे त्या धर्तीवर आपण नक्कीच इतर शाळांच्या भौतिक आणि शैक्षणिक सुविधा सुधारण्यासाठी काम करू आणि त्याचा मुलांची पटसंख्या आणि गुणवत्ता वाढण्यासाठी फायदा होईल असे मतही आयुक्त सिंह यांनी यावेळी व्यक्त केले.
सँडविक कोरोमंट इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य वित्तीय अधिकारी किरण आचार्य म्हणाले, सँडविक कोरोमंट इंडिया यांच्या सामाजिक दायित्व निधी मधून आम्ही शाळांना भौतिक आणि शैक्षणिक सुविधा पुरवण्यासाठी नेहमीच कार्यरत आहोत, परंतु सर्वात महत्त्वाचा वाटा शिक्षकांचा आहे. दिलेल्या साहित्याचा मुलांची गुणवत्ता सुधारण्यासाठी शिक्षकांनी पुरेपुर वापर करावा.
थिंकशार्प फाऊंडेशनचे संस्थापक संतोष फड म्हणाले, महानगरपालिकेचे अधिकारी व शाळा यांच्या उदंड प्रतिसाद व सहकार्यामुळे हे शक्य झाले.