नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थात एनसीबीच्या महासंचालकांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांना एक पत्र लिहिलं असून राज्य पोलिसांच्या अमलीपदार्थ विरोधी सेलकडे (एएनसी) असलेली पाच प्रकरणं तपासासाठी एनसीबीकडे वर्ग करण्यात यावीत, असे या पत्रात नमूद केले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे याबाबत आदेश असल्याचेही पत्रात नमूद करण्यात आल्याचे सांगण्यात येत असून या पत्रामुळे मोठे वादळ उठण्याची शक्यता आहे. या पत्राबाबत अधिकृत माहिती अद्याप दिली गेली नसली तरी अल्पसंख्याकमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी यावर गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे.
आर्यन खान ड्रग्ज प्रकरण सध्या गाजत आहे. नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांच्याशी संबंधित ड्रग्ज प्रकरणावरूनही मोठं वादळ उठलं आहे. या प्रकरणांचा तपास मुंबई एनसीबी ऐवजी दिल्लीतील एनसीबी अधिकाऱ्यांच्या एसआयटीकडे देण्यात आला आहे. एकीकडे हा तपास सुरू असतानाच २४ नोव्हेंबर रोजी एनसीबी महासंचालकांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांना एक पत्र लिहिले असून राज्य पोलीस तपास करत असलेली पाच प्रकरणे एनसीबीकडे वर्ग करण्यात यावीत, असे त्यात नमूद करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत अमित शहा यांचे निर्देश असल्याचा उल्लेखही या पत्रात करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
राज्य पोलिसांनी ड्रग्जशी संबंधित कोणती प्रकरणं एनसीबीला वर्ग करायची आहेत, याबाबत स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला नाही. त्यामुळेच संभ्रम निर्माण झाला असून या पत्रावर महासंचालकांनी वा मुंबई पोलिसांनी अद्याप कोणतीही चर्चा केलेली नाही. मात्र, लवकरच याबाबत पुढील निर्णय घेतला जाईल, असे मुंबई पोलीस दलातील सूत्रांनी सांगितले. याबाबत मुंबई पोलीस, पोलीस महासंचालक, एनसीबी यापैकी कुणीही अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाही.