पिंपरी कॅम्प परिसरात कॉपीराईट तपासणीच्या नावाखाली येणाऱ्या अधिकाऱ्यांकडून व्यापाऱ्यांना विनाकारण त्रास दिला जात असल्याचा आरोप करत व्यापाऱ्यांनी सोमवारी जोरदार एकजूट दाखवली. या विरोधामुळे धाड टाकण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना माघार घ्यावी लागली.
सोमवारी दुपारी साई चौक परिसरातील एका दुकानात कॉपीराईट तपासणीच्या नावाखाली काही अधिकाऱ्यांनी प्रवेश केला. ही माहिती मिळताच पिंपरी कॅम्पमधील व्यापारी तात्काळ सतर्क झाले. अनेक व्यापाऱ्यांनी आपापली दुकाने बंद ठेवत साई चौक परिसरात एकत्र येत तीव्र निषेध नोंदवला.
व्यापाऱ्यांची एकजूट आणि वाढता विरोध पाहता संबंधित अधिकाऱ्यांना अखेर परत फिरावे लागले. या घटनेदरम्यान पिंपरी कॅम्पमधील बहुतांश व्यापाऱ्यांनी सुमारे तीन तास दुकाने बंद ठेवली होती.
पिंपरी मर्चंट फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष श्रीचंद आसवानी यांनी सांगितले की, “कॉपीराईटच्या नावाखाली धाडी टाकून व्यापाऱ्यांकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला जातो. यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांनी एकजुटीने अशा बेकायदेशीर कारवायांविरोधात उभे राहणे गरजेचे आहे.”
तसेच, अशा प्रकारच्या दंडेलशाहीविरोधात व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन ठाम भूमिका घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.


