Sunday, July 14, 2024
Homeमहाराष्ट्रलोणावळ्याच्या पर्यटनाला गती टायगर-लायन्स पॉइंटवर होणार ग्लास स्काय वॉक , शासनाकडून ३३३...

लोणावळ्याच्या पर्यटनाला गती टायगर-लायन्स पॉइंटवर होणार ग्लास स्काय वॉक , शासनाकडून ३३३ कोटी मंजूर

पुणे-मुंबईपासून ठराविक अंतरावर असणाऱ्या असणाऱ्या लोणावळ्याजवळील मावळ तालुक्यातील कुरवंडे गावाजवळील ३३३ कोटी ५६ लाख रुपयांच्या टायगर, लायन पॉइंट पर्यटन स्थळ विकासाच्या प्रस्तावाला उच्चाधिकार समितीने बुधवारी मान्यता दिली. त्यामुळे या ठिकाणी दोन्ही पॉइंट जोडणारा दरी पूल, साहसी खेळांचा विकास प्रकाश व ध्वनी शो अशा सुविधायुक्त पर्यटन स्थळ विकासाला गती मिळणार आहे. तीन वर्षांत हा प्रकल्प साकारण्याचे उद्दिष्ट आहे. परिणामी, शनिवारी, रविवारसह अन्य दिवशी येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.

लोणावळ्याजवळील कुरवंडे गावाजवळ टायगर आणि लायन पॉइंट हे पर्यटन ठिकाण आहे. दोन ते तीन वर्षांपासून जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून वन विभागामार्फत आराखडा तयार करण्यात येत होता. त्या प्रकल्पासाठी वन विभागाची सुमारे १५ हेक्टर जागा उपलब्ध होणार असून, त्यासाठी वन विभागाचीच मान्यता घ्यावी लागणार होती. त्यामुळे या प्रकल्पाची जबाबदारी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे (पीएमआरडीए) जबाबदारी सोपविण्यात आली. पर्यटनस्थळ विकासाच्या दृष्टीने त्यांनी विकास आराखडा (डीपीआर) केला. त्या प्रस्तावाला जिल्हास्तरीय समितीची मान्यता घेऊन दोन ते तीन दिवसांपूर्वी तो उच्चाधिकारी समितीला पाठविण्यात आला. उच्चाधिकार समितीच्या बुधवारी झालेल्या बैठकीत सादरीकरण झाले. त्यावेळी समितीने ३३३ कोटी ५६ लाख रुपयांच्या प्रस्तावाला मान्यता दिली. त्यामुळे लोणावळ्याजवळ जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ विकसित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

पर्यटन स्थळ विकसित का?

सध्याच्या कुरवंडे गावाजवळील लायन आणि टायगर पॉइंटला दर शनिवारी, रविवारी सुमारे दहा हजार; तर दररोज दोन ते तीन हजार पर्यटक भेट देतात. त्यामुळे या ठिकाणी गर्दी होत आहे. टायगर आणि लायन पॉइंटच्या विकासासाठी किमान १५ हेक्टर जमीन रस्त्यासहित उपलब्ध होण्याची गरज आहे. त्या संदर्भात पुण्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सप्टेंबरमध्ये बैठक घेतली. या ठिकाणी अरुंद रस्ते, उपहारगृह, पाणी सुविधा, वाहनतळ, विद्युत व्यवस्था, माहिती फलकांचा अभाव, शौचालय सुविधा तसेच घनकचरा व्यवस्थापन या पर्यटन सुविधांचा सध्या अभाव आहे. त्यामुळेच अजित पवार यांनी प्रस्तावित कामांचा विकास आराखडा तयार कऱण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) आयुक्त राहुल महिवाल यांना सूचना दिल्या होत्या. त्या सूचनांच्या आधारे पीएमआरडीएने विकास आराखडा तयार केला. त्याचे सादरीकरण करण्यात आले होते.

टायगर पॉइंटची प्रस्तावित कामे

 • ग्लास स्काय वॉक १२५ मीटर लांब आणि ६ मीटर रुंद
 • एक हजार व्यक्तींसाठी अॅम्पी थिएटर
 • प्रकाश व ध्वनी शो
 • लहान मुलांची खेळण्याची जागा
 • प्रवेशद्वार व तिकीट घर
 • रस्ता रुंदीकरण – ४५ मीटटर
 • वाहनतळ – एकूण १५०० कार + दोन हजार स्कूटर
 • २० चौरस मीटर क्षेत्रफळाचे २४ गझिबो

साहसी खेळ

 • झिप लाइन – १२५ मी. लांब
 • बंजी जम्पिंग
 • वॉल क्लाइंबिग
 • फेरीस व्हील

लायन पॉइंटमध्ये काय?

 • लायन्स व टायगर पॉइंट जोडणारा दरीवरील पूल ९० मीटर लांब आणि ६ मीटर रुंद
 • प्रवेशद्वार व तिकीट घर
 • फूड पार्क इमारत, स्मरणिका दुकाने, प्रशासकीय इमारत, रुफ टॉप कॅफे, व्हुइंग डेक – चार हजार चौ.मी.
 • स्वच्छतागृह
 • रस्ता रुंदीकरण ४५ मीटर
 • वाहनतळ – एकूण ३०० कार + २५० स्कूटर
 • २० चौरस मीटर क्षेत्रफळाचे १२ गझिबो
 • आवश्यक विद्युत रोषणाई व उंच दिवे

जवळची ठिकाणे
ठिकाण अंतर (किलोमीटर)
लोहगड २३
विसापूर २३
राजमाची २८
भुशी धरण ६.२

आयएनएस शिवाजी ४.८
पुणे ८०
मुंबई ९२
आंबी व्हॅली १३
लवासा ८६
अलिबाग ८५

लोणावळ्याजवळील कुरवंडे गावाजवळ टायगर आणि लायन पॉइंटसाठी राज्य सरकारने मान्यता दिली. येत्या तीन वर्षांत हा प्रकल्प पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यामुळे स्थानिक भूमीपूत्रांना रोजगार मिळेल. तसेच पर्यटकांना विविध प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध होईल. जागतिक दर्जाचा हा प्रकल्प असून महाराष्ट्रात हा वेगळ्या पद्धतीचा पर्यटन स्थळ म्हणून पुढे येईल.- सुनील शेळके, आमदार, मावळ

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments