पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी–
पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सोमवारी दुपारी १२ वाजेपर्यंत शहरातील अनेक रस्ते, अंडरपास आणि पूल पाण्याखाली गेल्याने वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. अनेक ठिकाणी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली असून, अनेक मार्गांवर वाहने संथ गतीने सुरू आहेत. परिस्थिती लक्षात घेता वाहतूक पोलिसांनी नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडणे टाळण्याचे आवाहन केले आहे.
वाहतूक विभागाने दिलेल्या माहितीनुसार,
भोसरी वाहतूक विभागात -बाणाचा ओढा, माई वडेवाले चौक आणि क्लाऊड नाईन हॉटेल परिसरात पाणी साचल्याने वाहतूक संथ गतीने सुरू आहे.
बावधन वाहतूक विभागात- राधा चौक, ननावरे अंडरपास आणि भुगाव परिसरात पाणी साचल्याने वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
चाकण वाहतूक विभागातील – वाकी फाटा येथे मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्यामुळे वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.
दिघी-आळंदी वाहतूक विभागात – दाभाडे सरकार चौक येथील पूल, इंद्रायणी नदीवरील जुना व नवीन पूल, मरकळ गावातील पूल तसेच सिद्धबेट पूल पाण्याखाली गेल्याने सर्व प्रकारची वाहतूक बंद करण्यात आली आहे. तसेच श्री क्षेत्र आळंदी येथे सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे.
वाकड वाहतूक विभागात – ताथवडे अंडरपास आणि थेरगाव येथील रिव्हर व्ह्यू चौकातील पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद आहेत, तर पुनावळे अंडरपास येथे वाहतूक संथ गतीने सुरू आहे.
सांगवी वाहतूक विभागात – एमएम चौकातून चिंचवडकडे जाणारा मार्ग, साई चौक आणि रहाटणी येथील पूल पाणी साचल्यामुळे बंद करण्यात आले आहेत.
निगडी वाहतूक विभागात – रिव्हर व्ह्यू चौक पूर्णपणे बंद असून, केशवनगर, रुद्र पार्किंग आणि भेळ चौक परिसरातही वाहतुकीवर परिणाम झाला आहे. भेळ चौकातील गीता वडापाव परिसरात महापालिकेने मॅनहोल उघडे असल्याने रस्ता बंद केला आहे.
पिंपरी वाहतूक विभागात- वल्लभनगर अंडरपास आणि साई चौक अंडरपास पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत.
हिंजवडी वाहतूक विभागात – इंदिरा कॉलेजसमोरील शनी मंदिर परिसर, ताथवडे अंडरपास (हिंजवडी बाजू) येथे वाहतूक बंद असून, सूर्या अंडरपास आणि सयाजी अंडरपास येथे पाणी साचल्याने वाहतूक संथ गतीने सुरू आहे.
म्हाळुंगे वाहतूक विभागात – आळंदी फाट्यावरून आळंदीकडे जाणारा मार्ग बंद करण्यात आला आहे. तसेच केबीएम कंपनीजवळील नाला पूल खचल्याने त्या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद आहे.
चिखली वाहतूक विभागात – हवालदार वस्ती ते आळंदी, डायमंड चौक ते मोई आणि चिखली कमान ते स्मशानभूमी मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. लक्ष्मी चौक, कुदळवाडी, पाटीलनगर आणि जाधव सरकार चौक परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.
देहूरोड वाहतूक विभागात – सेंट्रल चौकात वाहतुकीचे मार्ग बदलण्यात आले असून, शिंदे पेट्रोल पंपाजवळील दोन्ही सर्व्हिस रोड पाण्याखाली गेले आहेत.
तळेगाव वाहतूक विभागात – घोराडेश्वर मंदिरासमोरील हॉटेल इंद्रायणी परिसर, हॉटेल थंड मामला परिसर तसेच तळेगाव-चाकण रोडवरील देव फाटा येथे पाणी साचले असून, नगरपरिषदेचे कर्मचारी तेथे पाणी उपसण्याचे आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे काम करत आहेत.
दरम्यान, सतत सुरू असलेल्या पावसामुळे शहरातील अनेक भागांत वाहतूक कोंडी निर्माण झाली असून, नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, पाण्याखाली गेलेल्या रस्त्यांवरून प्रवास टाळावा आणि वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन पिंपरी-चिंचवड वाहतूक विभागाने केले आहे.


