तीर्थक्षेत्र देहू येथील गायरान जागा पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाला देण्यात येऊ नये, यासाठी शुक्रवारी (१३ ऑक्टोबर) देहूगाव बंद ठेवण्यात येणार आहे. नगरपंचायत, नगराध्यक्षा, उपनगराध्यक्षा, सर्व नगरसेवक, नगरसेविका आणि जगद्गुरु श्री संत श्रेष्ठ तुकाराम महाराज संस्थानने फलकांच्या माध्यमातून बंदचे आवाहन केले आहे.
तीर्थक्षेत्र देहू येथील सर्वे नं. ९७ या गायरान जमीन क्षेत्रातील ५० एकर जागा पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाला देण्यासाठी शासनाकडून हालचाली सुरू आहेत. त्याला देहूगाव ग्रामस्थांचा तीव्र विरोध आहे. जागा गावच्या विकासासाठी उपलब्ध असावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे. क्रीडांगण, रुग्णालय, उद्यान, सांस्कृतिक भवन, भक्तनिवास अन्नछत्रालय, वाहनतळ, विश्रामगृह, संग्रहालय यांसह आध्यात्मिक, गावयात्रा, पालखी सोहळा, श्री संत तुकाराम महाराज जन्मोत्सव सोहळा, कार्तिक यात्रा, सुरू बीज सोहळा, आषाढी पालखी सोहळा, आध्यात्मिक, धार्मिक अशा विविध कार्यक्रमांसाठी आणि विविध विकास कामांसाठी जागा लागणार आहे. या कामांसाठी जागा अपुरी पडणार असल्याने येथे पोलीस आयुक्तालय उभारू नये, अशी भावना गावकऱ्यांची आहे.
पोलीस आयुक्तालयाला जागा देण्यासाठी अनेक वेळा विरोध करत पत्र व्यवहार करण्यात आला आहे. त्यामुळे गायरान जागा देण्यास विरोध दर्शविण्यासाठी शुक्रवारी देहू परिसरात सर्व व्यवहार बंद ठेवण्यात येणार आहेत. चौकात, परिसरात फलक लाऊन बंदचे आवाहन केले आहे.