पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी १७ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी १०-३० वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उत्तर प्रदेशच्या शहरी विकास विभागातर्फे वाराणसी येथे आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय महापौर परिषदेचे उद्घाटन आणि संबोधित करतील. परिषदेत देशभरातील विविध राज्यातील महापौर सहभागी होणार आहेत. “न्यू अर्बन इंडिया” ही परिषदेची थीम आहे.
शहरी भागात राहणीमान सुलभ व्हावे यासाठी पंतप्रधानांचा सतत प्रयत्न असतो. मोडकळीस आलेल्या नागरी पायाभूत सुविधा आणि सुविधांचा अभाव या समस्या सोडवण्यासाठी सरकारने अनेक योजना आणि उपक्रम सुरू केले आहेत. या प्रयत्नांचे विशेष लक्ष उत्तर प्रदेश हे राज्य आहे, ज्याने विशेषत: गेल्या पाच वर्षांत शहरी परिदृश्यात प्रचंड प्रगती आणि परिवर्तन पाहिले आहे. १७ ते १९ डिसेंबर या कालावधीत शहरी विकासाच्या क्षेत्रात भारत सरकार आणि उत्तर प्रदेश सरकारच्या महत्त्वाच्या कामगिरीचे प्रदर्शन करण्यासाठी एक प्रदर्शनही आयोजित करण्यात आले आहे.उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रीही यावेळी उपस्थित राहणार आहेत.


