१० एप्रिल २०२१,
आयपीएल २०२१ च्या पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने आयपीएल 2021ची सुरुवात दणक्यात केली आहे. तब्बल पाच वेळा आयपीएल चषक विजेत्या मुंबई इंडियन्सवर सरशी साधत विराटसेनेने आपल्या गुणांचे खाते उघडले. आज दूसरा सामना चेन्नई सुपरकिंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन संघात शनिवारी रंगणार आहे. मागच्या पर्वात निराशाजनक कामगिरी केल्यानंतर कर्णधार धोनीचा चेन्नई सुपरकिंग्ज संघ नव्या जोशात कामगिरी करण्यासाठी उत्सुक आहे. तर दिल्ली कॅपिटल्सनंही चेन्नई सुपरकिंग्जला धोबीपछाड देण्यासाठी कंबर कसली आहे.
दोन यष्टीरक्षक कर्णधार असलेले महेंद्र सिंग धोनी आणि ऋषभ पंत यांच्या रणनितीकडे क्रिकेट रसिकांचं लक्ष लागून आहे. ऋषभ पंत पहिल्यांदाज कर्णधारपदाच्या भूमिकेत मैदानात उतरणार आहे. ऋषभ पंतकडे महेंद्रसिंग धोनीचा उत्तराधिकारी म्हणून पाहिलं जातंय. तर महेंद्रसिंग धोनी आदर्श असल्याचं ऋषभ पंतने वारंवार सांगितलं आहे. दूसरीकडे कर्णधारपद यशस्वीरित्या भूषवलेल्या महेंद्रसिंग धोनीकडे अनुभवाची शिदोरी आहे. त्यामुळे कोण कुणावर भारी पडणार याची उत्सुकता लागली आहे.
मागच्या पर्वातील अंतिम फेरीत दिल्लीला मुंबईकडून पराभवाची चव चाखावी लागली होती. त्यामुळे यंदाचा आयपीएल किताब आपल्या नावावर करण्यासाठी दिल्लीचा संघ उत्सुक आहे. दिल्लीकडून शिखर धवनसोबत पृथ्वी शॉ आघाडीला फलंदाजी करतील. यंदाच्या पर्वात दिल्लीच्या संघात स्टीव स्मिथला स्थान मिळाल्याने संघ मजबूत स्थितीत आहे. त्याचबरोबर उमेश यादव, रविचंद्रन अश्विन यांच्यावरही लक्ष असणार आहे.