९ एप्रिल २०२१,
राज्य सरकारने लादलेल्या कोरोना निर्बंधामुळे आक्रमक झालेल्या पुण्यातील व्यापाऱ्यांनी तुर्तास सबुरीचे धोरण अवलंबायचे ठरवले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर आता व्यापारी महासंघाने पुण्यातील नियोजित आंदोलन स्थगित केले आहे. आम्ही आता सोमवारपासून दुकाने उघडू, अशी माहिती व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी दिली.
तत्पूर्वी आज पुण्यातील व्यापाऱ्यांनी सरकारच्या निर्णयाविरोधात बंड करत दुकाने उघडण्याचा इशारा दिला होता. पुणे महानगरपालिकेकडून शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने 30 एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाविरोधात शहरातील व्यापारी संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली होती. आज आपली दुकाने सकाळी 10 ते सायंकाळी 5 पर्यंत उघडण्याचे त्यांनी जाहीर केले होते.या पार्श्वभूमीवर पुण्याचे आयुक्त विक्रम कुमार यांनी शहरातील दुकाने उघडल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला होता.
व्यापाऱ्यांनी दुकाने उघडल्यास राज्य शासनाच्या नियमांची अंमलबजावणी केली जाईल, असा इशारा महापालिका आयुक्तांनी दिला. तसेच शहरात घातलेल्या निर्बंधांची अधिक कडक अंमलबजावणी करण्यासाठी पालिकेकडून पोलिसांना आणखी काही अधिकार दिले जाणार असल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले होते. मात्र, आता व्यापाऱ्यांनी तुर्तास आंदोलन मागे घेतल्याने हा संघर्ष टळला आहे.