मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील सत्ता बदलावर जोरदार ताशेरे ओढले आहेत.
अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. अजित पवारांनी (Ajit Pawar) विरोधी पक्ष नेतेपदाचा राजीनामा दिला. अजित पवार यांच्यासह 9 नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या सत्तानाट्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. सत्तेच्या खेळावर राज ठाकरे यांनी सडकून टीका केली आहे. “आज महाराष्ट्राचा सिंहासन सिनेमातील शेवटच्या दृश्यातील ‘दिगू टिपणीस’ झाला. राज्यातील किळसवाणं राजकारण जनता येत्या निवडणुकीत बंद पाडणार का?” असा सवाल राज ठाकरे यांनी केला आहे. महाराष्ट्रात पुढे अजून काय पाहावं लागेल हा विचार करुन मन धस्स होत असल्याचंही ते म्हणाले.
नक्की काय म्हणाले राज ठाकरे?
आज महाराष्ट्राचा सिंहासन सिनेमातील शेवटच्या दृश्यातील ‘दिगू टिपणीस’ झाला. उद्धव ठाकरेंचं ओझं शरद पवारांना (Sharad Pawar) उतरवायचं होतं, त्याचा पहिला अंक आज पार पडल्याचं राज ठाकरे म्हणाले. पवारांची (राष्ट्रवादीची) पहिली टीम सत्तेच्या दिशेने रवाना झाली, यथावकाश दुसरी पण सत्तेच्या सोपानासाठी रुजू होईलच, असा विश्वास मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी व्यक्त केला आहे.
तसंही सध्या शिंदेंना (Shinde Group) दिलं जाणारं (अवास्तव) महत्व महाराष्ट्र भाजपला (BJP) रुचत नव्हतंच, त्यावर अनायसे उतारा शोधल्याचं राज ठाकरे म्हणाले. ह्यात देशासमोर चित्रं काय उभं राहतंय, तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा झालेला चिखल. ज्या राज्याने देशाचं प्रबोधन केलं, त्या राज्याचं राजकारण इतक्या खालच्या स्तराला गेलं आहे हे पाहून जीव तुटतो आणि महाराष्ट्राच्या पुढे अजून काय काय वाढून ठेवलंय हा विचार करुन मनात धस्स होतं, असंही राज ठाकरे म्हणाले.
बाकी महाराष्ट्रातील जनता बेसावध आणि सोशिक आहे ह्याची खात्री असल्यामुळे ह्या सगळ्यांचे सत्तेच्या सिंहासनासाठीचे खेळ असेच सुरु राहणार की येत्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील जनता सत्तेचं हे किळसवाणं राजकारण बंद पाडणार? असा महत्त्वाचा प्रश्न देखील राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे.