महापालिकेकडून लक्ष्मी रस्त्यावर आज, शनिवारी पादचारी दिनानिमित्त करण्यात येणाऱ्या ‘वॉकिंग प्लाझा’साठी येथील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. सकाळी नऊपासून वॉकिंग प्लाझा संपेपर्यंत लक्ष्मी रस्त्यावर नगरकर तालीम चौक ते उंबऱ्या गणपती चौक या दरम्यानची वाहतूक बंद राहणार आहे.
नगरकर तालीम चौक ते उंबऱ्या गणपती चौक या दरम्यान सकाळी ११ ते दुपारी चार या वेळेत ‘वॉकिंग प्लाझा’ असेल. लक्ष्मी रस्त्यावरील या टप्प्यात सर्व दुचाकी, सर्व प्रकारच्या बस आणि कारना बाजीराव रस्त्याने जावे लागेल. ही वाहने अप्पा बळवंत चौकातून केळकर रस्त्यामार्गे टिळक चौकाकडे; तसेच अप्पा बळवंत चौकातून बाजीराव रस्त्याने शनिवारवाड्याकडे जाऊन इच्छितस्थळी जातील, अशी माहिती वाहतूक पोलिस शाखेने दिली.
पर्यायी मार्ग काय?
- केळकर रस्त्यावरील मंदार लॉजकडून लोखंडे तालीम चौकमार्गे लक्ष्मी रस्त्यावरील कुंटे चौकाकडे जाणारी वाहने रमणबाग शाळेपासून उंबऱ्या गणपती चौकाकडे जातील. पूरम चौकातून बाजीराव रस्त्याने शिवाजीनगरकडे जाणारी वाहने आवश्यकत्तेनुसार पूरम चौकातून टिळक रस्त्याने अलका टॉकीज, डेक्कनमार्गे वळविण्यात येतील.
- शिवाजी रस्त्याने स्वारगेटच्या दिशेने जाणारी वाहने आवश्यकत्तेनुसार स. गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रस्ता, डेक्कनमार्गे इच्छितस्थळी जातील.
पार्किंगची सोय
- हुतात्मा बाबू गेनू वाहनतळ, मंडई मिसाळ वाहनतळ, मंडई
- हरीभाऊ साने वाहनतळ, नारायण पेठ
- कै. शिवाजीराव आढाव वाहनतळ, नारायण पेठ
पीएमपीच्या मार्गात बदल
- लक्ष्मी रस्त्यावरून धावणाऱ्या पुण्यदशम सेवेच्या बस आणि गोखलेनगर, नीलज्योतीची बस बाजीराव रस्त्याने स. गो. बर्वे चौकामार्गे जंगली महाराज रस्त्याने जाईल.
- हडपसर-कोथरूड डेपो/वारजे माळवाडी बस भवानी पेठेतून नेहरू रस्त्याने शंकरशेठ रस्ता-स्वारगेट, टिळक रस्ता, डेक्कन मार्गे जाईल.
सकाळी ११ वाजता महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते लिंबराज महाराज चौकात या उपक्रमाचे उद्घाटन होईल. तिथून उंबऱ्या गणपती चौकापर्यंतचा चारशे मीटर रस्ता सुशोभित करण्यात आला आहे. पदपथ रंगविण्यात आले असून पदपथावरील विक्रेत्यांना या उपक्रमापुरती रस्त्यावर जागा देण्यात आली आहे. या काळात ‘सेफकिड्स फाउंडेशन’तर्फे लहान मुलांसाठी विविध मनोरंजनात्मक उपक्रम राबवले जातील. त्याचबरोबर पथनाट्य, संगीताचा आनंद घेत निर्धास्तपणे चालत खरेदीचाही आनंद घेता येईल. ‘चालण्याच्या आनंदाचा निर्देशांक’ या पुस्तिकेचे प्रकाशनही या वेळी होईल. सायंकाळी चार वाजता औंध येथे सुगम्य पदपथाचे व पाषाण सूस रस्त्यावरील सायकल ट्रॅकचे उद्घाटन होईल, अशी माहिती पथ विभागाचे कार्यकारी अभियंता दिनकर गोजारे यांनी दिली.