Tuesday, July 16, 2024
Homeताजी बातमीपदवीधर निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस, अखेरच्या क्षणाला राष्ट्रवादीकडून उमेदवारांची नावं...

पदवीधर निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस, अखेरच्या क्षणाला राष्ट्रवादीकडून उमेदवारांची नावं जाहीर

१२ नोव्हेंबर २०२०,
विधानपरिषद निवडणुकीत पदवीधर मतदारसंघासाठी मोर्चेंबांधणीला सुरुवात झाली आहे. आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे राष्ट्रवादीकडून अखेरच्या दिवशी औरंगाबादमधून सतीश चव्हाण यांनाच उमेदवारी जाहीर झाली आहे. तर पुण्यातून अरुण लाड यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी आज अर्ज दाखल होणार आहे. भाजप आणि काँग्रेसकडून उमेदवार जाहीर झाल्यानंतर अखेरच्या क्षणाला राष्ट्रवादीकडून उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहे. औरंगाबाद आणि पुणे पदवीधर मतदारसंघासाठी नाव निश्चित करण्यात आली आहे.

औरंगाबादमधून पुन्हा एकदा सतीश चव्हाण यांना संधी देण्यात आली आहे. मागील निवडणुकीत सतीश चव्हाण आणि भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांच्यात लढत झाली होती. यावेळी शिरीश बोराळकर यांनी सतीश चव्हाण यांचा पराभव केला होता. त्यामुळे भाजपकडून बोराळकर यांनाच संधी देण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा औरंगाबादमध्ये सतीश चव्हाण आणि शिरीष बोराळकर अशी लढत पाहण्यास मिळणार आहे.

दरम्यान, औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपमध्ये बंडखोरी झाली आहे. या मतदारसंघात भाजपच्या दोन इच्छुक उमेदवारांनी बंडखोरी केल्याचं पाहायला मिळालं. माजी बीड भाजप जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांनी आज उमेदवारी अर्ज भरला. रमेश पोकळे हे पंकजा मुंडे गटाचे समर्थक मानले जातात.

उमेदवारी अर्ज भरताना पोकळे यांनी दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची मूर्ती आणली होती. दुसरे बंडखोर उमेदवार प्रवीण घुगे यांनी आज उमेदवारी अर्ज भरला आहे. भाजपच्या वतीने अधिकृत उमेदवारी शिरीष बोराळकर यांना जाहीर केली असली तरी दोन जणांनी अर्ज भरल्याने पक्ष श्रेष्ठींसमोर पेच निर्माण झाला आहे. पुणे पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादीचे अरुण लाड यांना महाविकास आघाडीतर्फे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आली आहे.

पुण्यात भाजपकडून पुणे पदवीधरसाठी संग्राम देशमुख यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. या जागेसाठी महापौर मुरलीधर मोहोळ, रवींद्र भेगडे, अभाविपचे राजेश पांडे यांच्याही नावाची चर्चा होती पण, अखेर सर्व नावे वगळून सांगलीच्या संग्राम देशमुख यांचे नाव जाहीर झाले आहे. त्यामुळे पुण्यात अरुण लाड विरुद्ध संग्राम देशमुख सामना रंगणार आहे.

उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आज अंतिम तारीख आहे. पुढील महिन्यात 1 डिसेंबर रोजी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक होणार आहे. त्यानंतर तिसऱ्या दिवशी 3 डिसेंबरला निकाल लागणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments