महापालिका निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच रंगत असून, विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी प्रभागनिहाय रॅली, मिरवणुका व पदयात्रांच्या माध्यमातून जोरदार शक्तिप्रदर्शन केले. ढोल-ताशांच्या गजरात, घोषणांनी दुमदुमलेल्या वातावरणात उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.
सोमवार (दि. २९) रोजी एकूण ३२५ उमेदवारांकडून ६९६ नामनिर्देशन अर्ज दाखल झाले. त्यामुळे सर्व आठ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय परिसरात कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. आज मंगळवार (दि. ३०) हा अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस असल्याने आणखी मोठ्या प्रमाणात हालचाल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मंगळवार (दि. २३) पासून अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली असून, अखेरच्या टप्प्यात अनेक उमेदवारांनी कुटुंबीय, कार्यकर्ते आणि वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत अर्ज सादर केले. प्रभागातील प्रमुख रस्त्यांवरून काढण्यात आलेल्या रॅलीत महिला-पुरुष, ज्येष्ठ नागरिक, तरुणाई तसेच लहान मुलांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. तिरंगा किंवा केशरी फेटे, पक्षांचे मफलर आणि चिन्हे परिधान केलेले कार्यकर्ते मतदारांशी संवाद साधताना दिसत होते.
शक्तिप्रदर्शनामुळे काही भागांत वाहतूक कोंडी निर्माण झाली. गर्दीवर नियंत्रण ठेवताना पोलिसांना कसरत करावी लागली. दरम्यान, अनेक उमेदवारांनी मुख्य उमेदवारीसोबतच खबरदारी म्हणून कुटुंबातील सदस्य किंवा निकटवर्तीय कार्यकर्त्यांच्या नावाने अतिरिक्त अर्जही दाखल केले.
महापालिका प्रशासनाच्या माहितीनुसार आतापर्यंत एकूण २,५२१ उमेदवारांकडून ५,९६१ नामनिर्देशन अर्ज दाखल झाले आहेत. आज सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
पुढील निवडणूक प्रक्रिया पुढीलप्रमाणे :
• अर्ज छाननी : बुधवार (दि. ३१)
• वैध उमेदवारांची यादी : छाननीनंतर प्रसिद्ध
• उमेदवारी मागे घेण्याची अंतिम मुदत : शुक्रवार (दि. २) दुपारी ३ वाजेपर्यंत
• चिन्ह वाटप व अंतिम उमेदवार यादी : शनिवार (दि. ३)
• प्रचार कालावधी : १४ जानेवारी २०२६ पर्यंत
• मतदान : १५ जानेवारी २०२६
• मतमोजणी व निकाल : १६ जानेवारी २०२६


