Tuesday, April 22, 2025
Homeताजी बातमी‘मी आजही तरुणाईच्या मनातील मुख्यमंत्री’.....देवेंद्र फडणवीस

‘मी आजही तरुणाईच्या मनातील मुख्यमंत्री’…..देवेंद्र फडणवीस

चांगले वाईट यातील अंतर समजणे म्हणजेच संस्कार…..देवेंद्र फडणवीस
‘मोरया युथ फेस्टिव्हल’चे फडणवीस यांनी केले उद्‌घाटन

११जानेवारी२०२०,
आई, वडील, शिक्षक यांच्याकडून आणि महाविद्यालयीन काळात आरएसएसच्या माध्यमातून मला संस्काराचे धडे मिळाले. संस्कार म्हणजे विवेक, चांगल्या वाईटातील अंतर समजणे म्हणजेच संस्कार होय. छत्रपती शिवाजी महाराज व स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा माझ्यावर पगडा आहे. त्यांच्या विचारांमुळेच मला प्रेरणा मिळाली. प्रत्येक काम करताना मी सकारात्मक विचारानेच केले. त्यामुळेच ‘मी आजही तरुणाईच्या मनातील मुख्यमंत्री’ आहे. त्यामुळे ‘मी पुन्हा येईन’ अशी मिश्किल टिपणी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून कर्तव्य फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व राज्य लेखा समितीचे अध्यक्ष ॲड. सचिन पटवर्धन यांनी शनिवारी (दि. 10) चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आयोजित ‘मोरया युथ फेस्टिव्हल 2020’ चे आणि स्मृतीचिन्हाचे उद्‌घाटन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महापौर उषा उर्फ माई ढोरे, खासदार अमर साबळे, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, राज्य लेखा समितीचे अध्यक्ष ॲड. सचिन पटवर्धन, माजी मंत्री बाळा भेगडे, प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, उपमहापौर तुषार हिंगे, सिने अभिनेते राहुल सोलापूरकर आदी उपस्थित होते.  


   
यावेळी सोलापुरकर आणि पटवर्धन यांनी फडणवीस यांची मुलाखत घेतली. तसेच फडणवीस यांना युवक, युवतींनी प्रश्न विचारले त्यांची फडणवीस यांनी दिलखुलासपणे उत्तरे दिली. एका महाविद्यालयीन विद्यार्थीनीने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, मी कोणतेही काम प्रामाणिकपणे सकारात्मक विचाराने करतो. मी विरोधी पक्षनेता होतो. त्यावेळी मी फक्त समस्या मांडल्या नाहीत तर त्या समस्यांवर उपाय सांगितले आणि मी मुख्यमंत्री झाल्यानंतर त्या समस्यांबाबत सकारात्मक भूमिका घेऊन काम केले. मुख्यमंत्री पदाच्या कार्यकालात मला काही कमवायचे नव्हते तर जनतेचे आशिर्वाद मिळवायचे होते. आजही महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? असे विचारताच तरुणाईच्या डोळ्यापुढे माझीच प्रतिमा दिसते. त्यामुळे ‘मी पुन्हा येईन’ अशी मिश्किल टिपणी फडणवीस यांनी दिली.

आपण सभाधिट कसे झालात? या प्रश्नाला उत्तर देताना
फडणवीस म्हणाले, महाविद्यालयीन कालात वाद विवाद स्पर्धेत पहिल्यांदा मला अपयश आले. परंतू नंतर मित्राने सल्ला दिला की, ‘आपण मंचावर गेले की, असं समजायचं की, जगातले सर्व मुर्ख आपल्या समोर बसले आहेत. असं समजून आपण बोलायचं’ आणि नंतर मी वाद विवाद स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला. मात्र, नंतर हे खोटे आहे असेही जाणवलं आता वाटतं आपणच मुर्ख आहोत. शालेय जीवनात, गणपती उत्सवात नाटक करताना मला दोनवेळा नेत्याची भूमिका मिळाली होती. जागतिक पातळीवर आर्थिक मंदी असताना भारताचा विकास दर पाच टक्के आहे. परंतू मागील पाच वर्षात सरकारने पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणात उभारल्या आहेत. जीएसटी सारखी सक्षम करप्रणाली लागू केली आहे. पुढील पंधरा वर्षाचा काळ भारतासाठी ‘मेक ॲण्ड ब्रेक’ असा राहिल. त्यामुळे 2030 पर्यंत भारत मोठ्या विकसित राष्ट्रांमध्ये स्थान मिळवेल. विकासाची गुरुकिल्ली म्हणजेच पायाभूत सुविधा आणि त्या आपण मोठ्याप्रमाणात उभ्या करीत आहोत. उत्पादन क्षेत्र वाढत आहे. सेवा क्षेत्रातून साठ टक्के महसूल मिळतो. तर शेतीवर साधारणता 45 टक्के लोक अवलंबून आहेत. पण त्यातून पंधरा टक्के महसूल मिळतो. शेतीवर हवामानाचा, दुष्काळ, अतीवृष्टी विपरीत परिणाम होतो. शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर वाढला पाहिजे. त्यासाठी विश्व बँकेच्या सहाय्याने पाच हजार गावात नवतंत्रज्ञान वापरुन शेतीवर प्रयोग केले जातात. उत्पादन खर्च कमी करुन उत्पन्न वाढविण्यासाठी ड्रोनच्या माध्यमातून जागतिक नाणेनिधीच्या सहाय्याने प्रकल्प उभारले जात आहेत.

मला ‘करिअर’ बाबत आई, वडीलांचा दबाव नव्हता. गणिताचं माझं वैर नव्हतं, त्यामुळे आईला चिंता होती. पण मी दहावीत गणिता मध्ये जास्त मार्क मिळवून पास झालो. बारावीनंतर वकील होण्यासाठी प्रवेश घेतला. तेंव्हाच विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता म्हणून काम सुरु केले. त्यात मी ॲक्टीव्ह होतो. नंतर सुनिल आंबेकर आणि विलास यांच्या मार्गदर्शनाखाली वार्ड अध्यक्ष म्हणून भाजपचे काम सुरु केले. नंतर मी एकवीस वर्ष पुर्ण झाल्याबरोबरच नगरसेवक म्हणून निवडून आलो होतो. नगरसेवक झाल्यानंतर मी वकील फायनलची परिक्षा दिली आणि श्रीहरी अणे आणि आताचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधिश बोबडे यांच्या हाताखाली काम केले. त्यांच्याकडून मला खूप शिकायला मिळाले.

मला किशोर कुमार पासूनची गाणी पाठ आहेत. परंतू मला सुरात गाता येत नाही. माझा सुर लग्नाअगोदर पत्नीला कळाला असता तर तिने माझ्याशी लग्नच केले नसते. असे उत्तर देताच सभागृहात हास्याचे फवारे उडाले.
प्रस्ताविक, स्वागत ॲड. सचिन पटवर्धन आणि आभार सदाशिव खाडे यांनी मानले.

       

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments