विधानसभा निवडणुकीची घोषणा कधीही होण्याची शक्यता असताना महिन्याभरात तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यात आले आहेत. आज, शनिवारी मुंबई, ठाणे आणि विदर्भातील वाशीम येथे मिळून तब्बल ५६ हजार कोटींच्या प्रकल्पांचे भूमिपूजन किंवा उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होत आहेत. विदर्भातील कार्यक्रम आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ठाणे गाठले. ठाण्यात आल्यानंतर त्यांनी उपस्थित जनतेशी मराठीतून संवाद साधला. तसंच, महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी घेऊन आलोय, असं म्हणत त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली.
ठाणे शहरातील अंतर्गत मेट्रो प्रकल्पासह छेडा नगर-ठाणे पूर्वमूक्त मार्ग (विस्तारीत) प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी ठाण्यात आले. यावेळी जनतेशी संवाद साधताना पंतप्रधान म्हणाले, “कोल्हापूरची महालक्ष्मी, माहूरगडची आई रेणुका आणि वणीची सप्तश्रुंगी देवी यांना मी कोटी कोटी वंदन करतो. मी ठाण्याच्या धरतीवर कोपिनेश्वर मंदिरच्या चरणी प्रणाम करतो. मी छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांचंही नमन करतो. आज एक मोठी आनंदाची बातमी घेऊन मी महाराष्ट्रात आलो आहे.
“केंद्र सरकारने आमच्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. हा केवळ मराठी आणि महाराष्ट्राचा सन्मान आहे असं नाही तर या परंपरेचा सन्मान आहे ज्यांनी देशाला ज्ञान, दर्शन आणि अध्यात्म आणि साहित्याची समृद्ध संस्कृती दिली आहे”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
आम्ही केलेले प्रकल्प मोजायला गेलो तर दिवस कमी पडतील
“आम्हाला विकास कारायचा आहे आणि याआधी काँग्रेसने केलेल्या खड्यांनाही भरायचं आहे. विकसित भारत हे एनडीए सरकारचं लक्ष्य आहे. असे अनेक काम आहेत ते आम्ही मार्गी लावले आहेत. आमच्या सरकारने ही स्थिती बदलण्याचा प्रयत्न केला आहे. महाराष्ट्र विकासाच्या वाटेवर नेण्याचं काम केलं आहे. असे अनेक प्रकल्प आहेत ते आम्ही मार्गी लावले आहेत. आता ते जर मोजायला गेलो तर दिवस कमी पडेल”, असं म्हणत पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसवर टीका केली