गुणरत्न सदावर्तेंच्या आक्रस्ताळेपणा मुळे एसटी कर्मचाऱ्यांची चूल बंद होण्याची वेळ आली आहे अशी संतप्त प्रतिक्रिया एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी दिली आहे. सोमवारी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत तोडगा काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन मंत्री अनिल परब आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या कृती समितीसोबत बैठक पार पडली. मुंबईत सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक पार पडली. बैठकीनंतर समितीच्या सदस्यांनी कर्मचाऱ्यांना कामावर परतण्याचे आवाहन केले.
“एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली. कृती समितीच्या वतीने विलनीकरणचा सकारात्मक निर्णय आल्यानंतर राज्य सरकारने तो मान्य करावा अशी विनंती आम्ही केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांना पदनिहाय वेतनश्रेणीसह सातवा वेतन आयोगानुसार पगार मिळाला पाहिजे अशी मागणी आम्ही केली आहे. एसटी चालू झाल्यानंतर याबाबत चर्चा करण्यात येणार असल्याचे शरद पवार यांनी सांगितले आहे. तसेच एसटी पूर्णपणे चालू झाल्यानंतर कारवाई झालेल्या कर्मचाऱ्यांबाबतही विचार करण्यात येईल असे मंत्र्यांनी सांगितले आहे,” असे कृती समितीतील सदस्यांनी म्हटले.
“संपाची नोटीस दिलेले आणि नोटीस न दिलेल्या संघटनेचे कार्यकर्ते आंदोलन करत आहेत ते बैठकीसाठी उपस्थित होते. विलनीकरणाबाबत योग्य निर्णय आला तर ते करण्यात येईल असे अनिल परब यांनी सांगितले आहे,” असे कृती समितीच्या संदीप शिंदे यांनी सांगितले.
“ वकिल गुणरत्न सदावर्तेंच्या आक्रस्ताळेपणा मुळे एसटी कर्मचाऱ्यांची चूल बंद होण्याची वेळ आली आहे. कर्मचाऱ्यांच्या डोक्यामध्ये वकिल गुणरत्न सदावर्तेंनी विलनीकरणासंदर्भात भ्रम निर्माण केला आहे. कर्मचारी नैराश्यात असल्याचे वकिल म्हणत आहेत. पण गुणरत्न सदावर्ते हेच नैराश्यात आहेत. लोकांना भडकवण्याचे काम ते करत आहेत. दोन महिने सुरु असलेल्या संपामुळे सर्वसामान्य कर्मचाऱ्याची रोजीरोटी बंद होण्याची वेळ आली आहे. बैठकीमध्ये शरद पवार आणि अनिल परब यांनी पगारवाढीमध्ये ज्या त्रुटी आहेत त्या दूर करण्याची हमी दिली आहे. ज्यांची नोकरी गेली आहे भविष्यात त्यांची नोकरी देखील वाचणार आहे. त्यामुळे कामगारांनी आपली एसटी टिकली पाहिजे हा विचार केला पाहिजे,” अशी प्रतिक्रिया सुनील निरभवणे यांनी दिली आहे.