‘वाघ बकरी चहा’ समूहाचे कार्यकारी संचालक पराग देसाई यांचं निधन झालं. वयाच्या ४९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यापासून सावरताना पडल्यामुळे जबर जखमी होऊन त्यांच्या मेंदूला दुखापत झाली होती. त्यांच्या अकस्मात निधनाने कुटुंबासह उद्योग विश्वावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी विदिशा देसाई आणि कन्या परिषा असा परिवार आहे.
गेल्या आठवड्यात मॉर्निंग वॉकला जात असताना पराग देसाई यांच्यावर रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला होता. कुत्र्यांच्या हल्ल्यापासून स्वत:ला वाचवण्याच्या प्रयत्नात ते घरासमोरच पाय घसरुन ते पडले होते. यात जबर मार लागल्यामुळे त्यांना ब्रेन हॅमरेज झाले होते.
सुरक्षारक्षकाने कुटुंबीयांना माहिती देताच त्यांना इस्पितळात नेण्यात आले. देसाई यांच्यावर शेल्बी रुग्णालयात उपचार सुरू होते. परंतु प्रकृतीत सुधारणा होत नसल्यामुळे त्यांना झायडस रुग्णालयात नेण्यात आले. सात दिवस ते व्हेंटिलेटरवर होते. परंतु काल (रविवार २२ ऑक्टोबर) सकाळी अहमदाबादमधील खासगी रुग्णालयातच त्यांची प्राणज्योत मालवली. सोमवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

पराग देसाई हे वाघ बकरी समूहाचे व्यवस्थापकीय संचालक रस देसाई यांचे सुपुत्र होते. कंपनीच्या विक्री, विपणन आणि निर्यात विभागाची जबाबदारी त्यांच्यावर होती. कंपनीची दीड हजार कोटींची उलाढाल आहे. १९९५ मध्ये त्यांनी कारकीर्द सुरु केली. मात्र ऐन उमेदीच्या भरातच त्यांच्यावर काळाने घाला घातला.