पिंपरी चिंचवडमधील पिंपळेगुरव येथे १० पेक्षा अधिक गोळ्या झाडून एकाचा खून करण्यात आला आहे. ही घटना पिंपळे गुरवमधील काटे पुरम चौकात सकाळी दहाच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी सांगवी पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. दोन आरोपींनी बेछूट गोळीबार केला असून पैकी दोन गोळ्या योगेश जगताप यांना लागल्या असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या गोळीबारात योगेश जगताप यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज दत्त जयंती असल्याने काटे पुरम चौकात योगेश जगताप हे उपस्थित होते. तेव्हा त्यांच्यावर अचानक गोळीबार करण्यात आला, दोन अज्ञात आरोपी हे त्यांच्यावर बेछूट गोळीबार करत होते, असं सीसीटीव्ही फुटेजमध्ये पाहायला मिळतंय. या घटनेत जगताप गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र काही मिनिटांमध्येच त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला अशी माहिती सांगवी पोलिसांनी दिली आहे. अद्याप खुनाचे कारण समजू शकले नाही. आर्थिक व्यवहारातून खून झाल्याची चर्चा सुरू आहे.
काटेपुरम चौक हा पिंपळे गुरव येथील मुख्य चौक आहे. तिथे नेहमी नागरिकांची वर्दळ असते. जेव्हा हा गोळीबार झाला त्यावेळी अनेक नागरिक त्या ठिकाणी उपस्थित होते. दोघांनी केलेल्या गोळीबारात नागरिक देखील जखमी होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. योगेश जगताप यांच्यावर गोळीबार करताच आरोपी हे घटनास्थळावरून पसार झाले. रस्त्यावरील दुचाकीचालकला पिस्तूलाचा धाक दाखवून त्याची दुचाकी पळवून नेली आहे. एम.एच 12 पी.जे 1832 असा निळ्या रंगाच्या एक्टिव्हाचा नंबर आहे, अशी माहिती सांगवी पोलिसांनी दिली आहे.
आरोपींच्या हातून पिस्तुल पेट्रोल पंपावर पडले!
आरोपींनी गोळीबार करून दुचाकीवरून ते पसार झाले. दरम्यान, ते भोसरी – नाशिक रस्त्याच्या दिशेने निघाले होते. त्यांनी पळवलेल्या दुचाकीत पेट्रोल नसल्याने ते पेट्रोल भरण्यास गेले तिथे त्यांच्या दुचाकीला डॅश लागला, मग त्यांच्या हातातून गुन्ह्यात वापरलेले पिस्तुल पडले, दरम्यान, त्यांनी पिस्तुल त्याच ठिकाणी सोडून पळ काढला आहे अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.