लेह-लडाख येथे पर्यटनासाठी गेलेल्या पिंपरी-चिंचवडमधील तरुणांच्या कारला राजस्थानमध्ये भीषण अपघात झाला. दिल्ली-मुंबई महामार्गावर कार पुलावरून कोसळून झालेल्या या अपघातात शहरातील तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. बुधवारी कोटा येथील केथून पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही दुर्दैवी घटना घडली.
अपघातातील मृतांची नावे:
• कुणाल चोरडिया (वय २५, रा. शांतिबन सोसायटी, चिंचवड गाव)
• मयुरेश पाडाळे (वय २३, रा. म्हाळुंगे पाडाळे)
• सिद्धान्त आल्हाट (वय २१, रा. थेरगाव)
पाच दिवस बर्फवृष्टीत अडकले होते तरुण
मिळालेल्या माहितीनुसार, थेरगाव, वाकड आणि म्हाळुंगे परिसरातील सुमारे १०-१२ तरुणांचा गट २७ फेब्रुवारी रोजी लेह-लडाख आणि जम्मू-काश्मीर पर्यटनासाठी गेला होता. काही दिवसांपूर्वी कारगिलमध्ये झालेल्या प्रचंड बर्फवृष्टीमुळे हे सर्व तरुण पाच दिवस तिथेच अडकून पडले होते. स्थानिक नेत्यांनी ‘बीएसएफ’ (BSF) अधिकार्यांशी संपर्क साधल्यानंतर त्यांची तिथून सुरक्षित सुटका करण्यात आली होती. मात्र, परतीच्या प्रवासात काळाने त्यांच्यावर घाला घातला.
एका मित्राचा जीव थोडक्यात वाचला
या प्रवासात मृत तरुणांसोबत आणखी एक मित्र कारमध्ये होता. मात्र, मंगळवारी त्याला अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने तो विमानाने पुण्याला परतला. गुरुवारी सकाळी अपघाताची बातमी समजताच त्याला मोठा मानसिक धक्का बसला आहे.
शिक्षण घेता घेता वडिलांना करत होते मदत
मृत कुणाल चोरडिया हा इंदिरा कॉलेजमध्ये बीबीएचे शिक्षण घेत होता, तर मयुरेश आणि सिद्धान्त हे दोघेही उच्च शिक्षण घेत असतानाच आपल्या वडिलांच्या व्यवसायात मदत करत होते. ऐन उमेदीच्या काळात या तरुणांचा अपघाती मृत्यू झाल्याने संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहरावर शोककळा पसरली आहे.
प्रशासकीय मदत सुरू:
या घटनेबाबत आमदार शंकर जगताप यांनी माहिती दिली की, “राजस्थानमधील ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. आम्ही तिथल्या स्थानिक प्रशासनाशी सातत्याने संपर्कात आहोत. मृतांचे पार्थिव आज गुरुवारी सकाळी शहरात आणले जाणार असून, पीडित कुटुंबांना सर्व आवश्यक मदत पुरवली जात आहे.”


