सरकारसोबत जा, मी राजीनामा देतो असं शरद पवार म्हणाल्याचा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केला आहे. देवगिरी बंगल्यावरील बैठकीला सुप्रिया सुळेंनाही बोलावल्याचा दावा अजित पवारांनी केली आहे. एवढच नाही तर अध्यक्षपदाच्या राजीनाम्यानंतरची वायबीबाहेरची आंदोलनं ठरवून केली. शरद पवार मला एक सांगतात आणि इतरांना एक सांगतात, असे देखील अजित पवार म्हणाले.
अजित पवार म्हणाले, शरद पवार यांनी सत्तेत सहभागी व्हा असं सांगितलं यासोबतच राजीनामा देतो असं देखील सांगितलं. शरद पवार यांनी आम्हा तिघांना ते राजीनामा देणार असल्याबाबत माहिती होतं. म्हणून मी राजीनाम्याबाबत बोललो. शरद पवार मला एक सांगत होते आणि करत वेगळच होते.जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील यांची घरी मीटिंग झाली आणि दुसऱ्या दिवसापासुन आंदोलन सुरू झाले. शरद पवार यांची सातत्यानं धरसोड वृत्ती होती.
एका व्यवसायिकाच्या घरी शरद पवारांनीच बोलवले- अजित पवार
भाजपसोबत जाण्याचा 2 जुलैला आम्ही घेतलेला निर्णय मान्य नव्हता तर मग आम्हाला 17 जुलैला बोलावलं कशाला? असा सवाल अजित पवार यांनी केला आहे. पहिल्यांदा मंत्री या म्हणाले आणि त्यानंतर आमदार यांना घेऊन या म्हणाले. गाडी ट्रॅकवर होती मग काय झालं? आम्हाला गाफील का ठेवण्यात आलं? आम्हाला 12 ऑगस्टला पुण्यात एका व्यवसायिकाच्या घरी बोलावलं. मला बोलवलं म्हणून मी गेलो. मग सातत्यानं असं का करत आहात? असा सवाल अजित पवरांनी केला आहे.
जो बोलतो तो चुकतो, जो तोंडच उघडतंच नाही तो काय बोलणार : अजित पवार
आम्ही राष्ट्रवादी म्हणूनच काम करत आहे. जागा वाटपासंदर्भात तुम्ही काळजी करू नका, सगळ्यांना न्याय मिळेल. माझ्यासकट नऊ मंत्र्यांनी चार-चार जिल्हे वाटून जबाबदारी घेतली पाहिजे जो बोलतो तो चुकतो, जो तोंडच उघडतंच नाही तो काय बोलणार. मी हे बोललोच नाही, मी हे ऐकलंच नाही असं मी बोलत नाही, असे म्हणत अजित पवारांनी शरद पवारांना टोला दिला आहे.
आपली राष्ट्रवादी हीच मूळ राष्ट्रवादी : अजित पवार
आपली राष्ट्रवादी हीच मूळ राष्ट्रवादी आहे. सगळ्यांच्या आशिर्वादानं पुढे चला, काही चुकलं तर सांगा. प्रफुल पटेलांनी 2004 ची गोष्ट सांगितलं जी आम्हाला माहितीच नव्हती. पुढे प्रफुलभाई म्हणाले की आणखी बऱ्याच गोष्टी आहेत मात्र आपल्याला कुणाची बदनामी करायची नाही, असे देखील अजित पवार म्हणाले.