चिंचवडला एकाच वेळी दोन ठिकाणी झालेल्या गोळीबार प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. अन्य एक आरोपी फरार आहे.शाहरूख शहानवाज शेख (वय-२९, रा. गुलाबनगर, दापोडी), मोहमंद शोएब नौसार अलवी (वय-२६, रा. पवार वस्ती, दापोडी), फारूख शहानवाज शेख (वय-३१, रा. पत्राचाळ, लिंक रस्ता, चिंचवड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. सागर मलिक उर्फ मायकल हा आरोपी फरार आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचवड लिंक रस्ता, भाटनगर, बौद्धनगर परिसरात मंगळवारी सायंकाळी दोन ठिकाणी हवेत ८ गोळ्या झाडण्यात आल्या. एका रिक्षातून आलेल्या आरोपींनी हे कृत्य केल्याचे सीसीटीव्हीच्या चित्रणाद्वारे निदर्शनास आले. पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, उपायुक्त विवेक पाटील, स्वप्ना गोरे घटनास्थळी दाखल झाले होते. तपासासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास इंगवले, मंगेश भांगे, हरिश माने यांच्यासह विविध पोलीस पथके रवाना करण्यात आली होती. आरोपींना काही तासातच अटक करण्यात पोलिसांना यश आले.