Tuesday, July 8, 2025
Homeताजी बातमीस्वच्छता ही सेवा उपक्रमाअंतर्गत हजारो जणांनी घेतली स्वच्छतेची शपथ..

स्वच्छता ही सेवा उपक्रमाअंतर्गत हजारो जणांनी घेतली स्वच्छतेची शपथ..

आम्ही स्वच्छतेच्या बाबतीत जागरुक राहू आणि त्यासाठी वेळही देऊ,दरवर्षी १०० तास म्हणजेच प्रत्येक आठवडयातुन २ तास श्रमदान करून स्वच्छतेचा या संकल्पाला पुर्ण करू, आम्ही स्वतः घाण करणार नाही आणि दुसऱ्यालाही करू देणार नाही, सर्व प्रथम आम्ही स्वतःपासुन,आमच्या कुटुंबापासुन, आमच्या गल्ली-वस्तीपासुन, आमच्या गावापासुन तसेच आमच्या कार्यस्थळापासुन या कामास सुरवात करू,आम्हाला हे मान्य आहे, कि जगामधील जे देश स्वच्छ आहेत त्याचे कारण त्या ठिकाणचे नागरीक स्वतः घाण करीत नाही व घाण करून देत नाहीत या विचारांनी आम्ही गावोगावी आणि गल्लोगल्ली स्वच्छ भारत मिशनचा प्रचार करू,आम्ही आज जी शपथ घेत आहोत ती आणखी लोकांनाही घ्यायला लावू, तेही आमच्यासारखेच स्वच्छतेसाठी १०० तास देतील यासाठी आम्ही प्रयत्न करू,आम्हाला माहित आहे की, स्वच्छतेच्या दिशेने टाकलेले आमचे पाऊल संपुर्ण देशाला स्वच्छ करण्यासाठी मदत करेल ” अशी संकल्पपूर्वक शपथ ब्रॅन्ड अ‍ॅम्बेसिडर, माजी पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक व विद्यार्थ्यांनी आयुक्त शेखर सिंह, सिनेअभिनेत्री प्रार्थना बेहेरे यांच्या उपस्थितीत घेतली.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महात्मा गांधी यांच्या २ ऑक्टोबर, जयंती निमित्त त्यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रम १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत राबविला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज पिंपळेगुरव येथील रामकृष्ण मंगल कार्यालयामध्ये भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी स्वच्छतेची शपथ घेतली.

या कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, माजी नगरसेवक शंकर जगताप, सागर अंघोळकर, संतोष कांबळे तसेच महेश जगताप, राहुल जवळकर, माजी नगरसेविका उषा मुंढे, उपआयुक्त अण्णा बोदडे, सिताराम बहुरे, ब्रॅन्ड ॲम्बेसिडर यशवंत कन्हेरे, सुरेश डोळस, आदिती निकम, संगीता जोशी, विशेष अधिकारी किरण गायकवाड, आरोग्य विभागाचे सहाय्यक आयुक्त अजिंक्य येळे, मुकेश कोळप, श्रीकांत कोळप, आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागरिक संघाचे तसेच इसीए संस्थेचे पदाधिकारी, केपीएमजीचे विनायक पद्मने आणि स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी, महापालिका शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षीका व विद्यार्थी उपस्थित होते.

आपले शहर व आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणे आणि एकमेकांमध्ये स्वच्छतेबद्दल जागरूकता वाढविणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. याची सुरूवात प्रत्येकाने सर्वात आधी आपल्या घरापासून करायला हवी जेणेकरून स्वच्छतेचा संदेश एका कुटुंबापासून अनेक कुटुंबांपर्यंत पोहोचेल. शहरातील वातावरण पर्यावरणपूरक ठेवण्यासाठी तसेच परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी महापालिका विविध उपाययोजना तसेच उपक्रम राबवित असते. या शहरातील नागरिक महापालिकेच्या या उपक्रमांना उत्तम प्रतिसाद देत असून ओला सूका कचरा वर्गीकरण तसेच स्वच्छतेच्या बाबतीत जागरूक राहून सहकार्य करत असतात. ही अभिमानाची बाब असून नागरिकांच्या सहभागातून लवकरच पिंपरी चिंचवड हे शहर देशात स्वच्छतेच्या बाबतीत अव्वलस्थानी येईल, असा विश्वास असल्याचे मत आयुक्त शेखर सिंह यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्राच्या विविध भागात चित्रिकरणादरम्यान प्रवास करताना असे लक्षात येते की, इतर शहरांच्या तुलनेत पिंपरी चिंचवड शहर हे सर्वात स्वच्छ सुंदर व राहण्यायोग्य आहे. येथे प्रवास करताना प्रशस्त रस्ते, हिरवळीने दाटलेला परिसर, आल्हाददायक वातावरणामुळे या शहरात येण्यास नेहमी आनंद वाटतो. सफाई कामगारांच्या जीवनाचा विचार केला असता ही सर्व मंडळी वर्षभर अगदी सणासुदीलाही कामावर येऊन स्वच्छतेचे काम करत असतात. त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत अभिनेत्री प्रार्थना बेहेरे यांनी त्यांच्या निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छाही दिल्या.

आजच्या कार्यक्रमात निशीता या लहान मुलीने थीम डान्स करून सर्वांची मने जिंकली. सफाई सेवकांना आदराची वागणूक द्यावी. त्यांना सफाई काका आणि सफाई मावशी असे म्हणून पुकारावे, अशा आशयाचे मत या लहानग्या मुलीने बोलताना व्यक्त केले. सफाई कामगारांच्या वेदना तिने सादर केलेल्या थीम डान्सच्या माध्यमातून सादर केल्या. तिचा कार्यक्रम पाहून अभिनेत्री प्रार्थना बेहेरे यांच्यासह अनेकजण भावूक झाले होते.

या कार्यक्रमात प्रभागनिहाय कार्यरत असणाऱ्या स्वच्छतादूतांचा आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. त्यामध्ये संघराज बेगडे, आनंदा मोरे, अमोल चंदनशिवे, संतोष काटे, मिलींद पात्रे, पुंडलिक साळुंखे, सुभाष दंडवळ, निकेश सरोदे, बाळासाहेब कोडी, संगीता जाधव, गंगाबाई गोडे, माधुरी पाटील, सुरेखा गोडे या स्वच्छतादुतांचा समावेश होता. तर पर्यावरणविषयक कामकाज करणाऱ्या पर्यावरण संवर्धन संघटना, रिपब्लिकन वाहतूक आघाडी विश्वशांती रिक्शा संघटना तसेच संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागरिक संघ यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.

यादरम्यान, शास्त्रीय नृत्याद्वारे गणेश वंदना, माननीयांचे मनोगत, गाण्यांचा कार्यक्रम, ओला कचरा-सुका कचरा या विषयावर आधारित नृत्याचा कार्यक्रम, व्यायामाचा मनोरंजनपर प्रकार म्हणून झुंबा डान्स असे विविध कार्यक्रम घेण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी केले. तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आणि आभार प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments