Saturday, September 30, 2023
Homeताजी बातमीकाळजावर झालेली ही जखम कधीही भरुन येणार नाही - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

काळजावर झालेली ही जखम कधीही भरुन येणार नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

२६ नोव्हेंबर २०२०
‘२६ नोव्हेंबर हा दिवस आपण कधीही विसरू शकत नाही. त्या दुर्दैवी घटनेला १२ वर्षे झाली, यापुढेही कित्येक वर्ष उलटतील, पण काळजावर झालेली ही जखम कधीही भरून येणार नाही,’ अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज आपल्या भावना व्यक्त केल्या.

निमित्त होतं महाराष्ट्र पोलीस महासंचालनालयातील हुतात्मा दालनाचं उद्‌घाटन व कॉफी टेबल बुक प्रकाशनाचं. गृहमंत्री अनिल देशमुख पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे हे देखील यावेळी उपस्थित होते. २६ नोव्हेंबरच्या हल्ल्यात शहीद झालेल्या सर्व पोलिसांना मुख्यमंत्र्यांनी वंदन केले. २६ नोव्हेंबरच्या (26/11) त्या रात्री विजय साळसकर यांच्यासोबत झालेल्या संभाषणाची आठवण मुख्यमंत्र्यांनी सांगितली. ‘त्या दिवशी मी मुंबई बाहेर होतो. मुंबईतील घटना कळताच प्रथम विजय साळसकरांना फोन लावला. घटनेची माहिती देताना साळसकरांनी सांगितले की, मी आता घरी असून लगेचच घटनास्थळी जात आहे. काही वेळाने पुन्हा त्यांना फोन लावला, पण तो फोन उचलला गेलाच नाही आणि नंतर ती दुर्दैवी घटना घडली. बारा वर्षे झाली, यापुढेही कित्येक वर्ष उलटतील, पण काळजावर झालेली ही जखम कधीही भरुन येणार नाही,’ असं मुख्यमंत्री म्हणाले.

महाराष्ट्र पोलिसांच्या कामाचंही मुख्यमंत्र्यांनी तोंडभरून कौतुक केलं. ‘सण-उत्सव असो वा सभा असो, जमलेल्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आमचे पोलीस चोवीस तास कर्तव्य बजावत असतात. स्वत:च्या कुटुंबातील सुखदु:ख बाजूला ठेवून जनतेच्या सुखदु:खात सहभागी होतात. अशा या आमच्या पोलिसांचा मला अभिमान आहे,’ असं मुख्यमंत्री म्हणाले. ‘पोलीस विभागाच्या सक्षमीकरणासाठी राज्य सरकार सदैव कटिबद्ध असून जे काही करणं शक्य आहे, ते सर्व करणारच,’ असं वचन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं.

‘पोलीस हा एक महत्त्वाचा घटक आहे. तो सुदृढ राहिलाच पाहिजे. त्याला सुदृढ ठेवणं हे आमचं कर्तव्य आहे. यापुढं मुंबई किंवा महाराष्ट्रावर हल्लाच काय, अतिरेकी मुंबईचं नावही घेऊ शकणार नाहीत, त्यांना धडकी भरेल,’ असं पोलीस दलाचं सक्षमीकरण करू,’ अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments