महात्मा गांधींच्या स्वप्नातील स्वयंपूर्ण खेडं महाराष्ट्रात आहे. राष्ट्रपतींनीही या गावाचं कौतुक केलंय.
‘स्वयंपूर्ण खेडी’ हे महात्मा गांधींजींचं स्वप्न होतं. गांधीजींच्या स्वप्नातील भारातामध्ये ग्राम स्वराज्य ही एक महत्त्वाची संकल्पना होती. त्या संकल्पनेने गाव स्वयंपूर्ण होण्यावर भर दिला आहे. स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतर देशातील अनेक खेड्यांनी या दिशेनं वाटचाल सुरू केलीय. या गावांनी स्वयंस्फुर्तीनं विकास करत इतरांसमोर आदर्श ठेवला आहे. पुणे जिल्ह्यातील टिकेकरवाडी हे यापैकीच एक आदर्श गाव आहे.
पुण्यापासून जवळपास 120 किलोमीटर अंतरावर टिकरेवाडी हे 1100 लोकसंख्या असलेलं छोटसं गाव आहे. पुष्पावती नदीच्या किनाऱ्यावर वसलेल्या या गावानं देशात अनेकांना जमलं नाही, असं काम केलंय. टिकरेवाडी ग्रामपंचायतीनं ओला कचरामुक्त गाव हे ध्येय निश्चित ठेवून कामाला सुरूवात केली.लहान-मोठ्या गावांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी ग्रामपंचायत आणि सरकारी इमारतीवर सौर ऊर्जा पॅनल बसवण्याची सरकारी योजना आहे. केंद्र आणि राज्य सरकार तसंच ग्रामपंचायतीच्या सहभागातून ही योजना राबवण्यात येते. टिकेकरवाडीत असे सौर पॅनल बसवण्यात आले आहेत.
‘गावचा कारभार विनाखर्च व्हावा यासाठी गावाने वीज बचतीचं धोरण हाती घेतलंय. या माध्यमातून गावात सोलर प्रकल्प उभारण्यात आले आहेत. गावातील पथदिवे, शाळा मंदिर,पाणी योजना यासाठी लागणी वीज सौरऊर्जेतून तयार केली आहे. वीज बील मुक्त ग्रामपंचायत हे आमचे ध्येय असल्याचं टिकरेवाडीचे सरपंच संतोष टिकेकर यांनी सांगितलं.
टिकरेवाडीच्या ग्रामपंचायतीनं या योजनांचा फायदा घेतला. या ग्रामपंचायतीनं गावातच गोबर गॅस निर्मिती प्रकल्प सुरू केला. या प्रकल्पातून सर्व कुटुंबांना गोबर गॅस उपलब्ध झालाय. त्याचबरोबर शेती आणि शेतमालही खतांच्या विरहीत फुलू लागलाय. त्यामुळे शेतीच्या उत्पादनातही वाढ झालीय.
‘आमच्या शाळेत पहिली ते चौथीचे वर्ग भरतात. या वर्गात 39 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळेत 5 किलो वॅट सौर उर्जा निर्मितीचा प्रकल्प कार्यरत आहे. त्यामुळे गावातील वीज कधीही जात नाही. तसंच शाळेला वीज बिल येत नाही, असं गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेचे मुख्याध्यापक संतोष गडगे यांनी सांगितलं.
टिकरेवाडीमध्ये सुरू असलेल्या या प्रयोगाची दखल केंद्र सरकारनंही घेतलीय. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या गावाचा सन्मान करण्यात आलाय. टिकरेवाडी पॅटर्नचं अनुकरण अन्य गावांनीही केला तर त्यांचेही अनेक प्रश्न सुटू शकतात.