केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण बारी देवा’ हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. हा चित्रपट प्रदर्शित होऊन एक महिना झाला आहे. मात्र तरीही या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर घोडदौड सुरु आहे. या चित्रपटाने ३० दिवसांत ७०.२० कोटींची कमाई केली आहे. ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटानंतर आता केदार शिंदेंनी नव्या प्रोजेक्टची घोषणा केली आहे.
केदार शिंदे यांनी नुकतंच इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत केदार शिंदे, लेखिका वैशाली नाईक आणि दिग्दर्शक ओमकार मंगेश दिसत आहेत. या फोटोला दिलेल्या कॅप्शनने सर्वांचेच लक्ष वेधून घेतलं आहे.
“एक कहानी खतम तो दुजी शुरु हो गयी मामू.. बाईपण भारी देवा नंतर.. काहीतरी भारी..”, असे कॅप्शन केदार शिंदेंनी दिले आहे. त्याबरोबरच त्यांनी #बाईपणभारीदेवा #somethingnew #whatscooking असे हॅशटॅगही दिले आहेत.
केदार शिंदे यांच्या पोस्टवर अभिनेत्री क्रांती रेडकरने “आम्ही वाट बघतोय”, असे म्हटले आहे. तर सुकन्या मोने यांनी “हो” अशी कमेंट केली आहे. केदार शिंदे यांच्या या पोस्टवर अनेकांनी “बाईपण भारी देवा चित्रपटाचा दुसरा भाग येणार का?” अशा आशयाच्या कमेंट केल्या आहेत.