२५ ऑगस्ट २०२१,
लॉडर्सच्या दुसऱ्या कसोटीत झगडणाऱ्या इंग्लंड संघावर ऐतिहासिक विजय संपादन केल्यानंतर बुधवारपासून लीड्सला सुरू होणाऱ्या तिसऱ्या कसोटीतही वर्चस्व गाजवून भक्कम आघाडी मिळवण्याचा निर्धार भारतीय क्रिकेट संघाने केला आहे. प्रदीर्घ काळ मोठ्या खेळीसाठी प्रतीक्षेत असलेला भारतीय कर्णधार विराट कोहली लीड्सवर छाप पाडण्यासाठी उत्सुक आहे.
नोव्हेंबर २०१९मध्ये कोहलीने अखेरचे आंतरराष्ट्रीय शतक झळकावले होते. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत तो दोनदा चाळिशीत बाद झाला आहे. परंतु आधुनिक क्रिकेटमधील या अव्वल फलंदाजांकडून अपेक्षाही तितक्याच उंचावल्याने टीका होत आहे. पहिल्या दोन कसोटी सामन्यांत उजव्या यष्टीबाहेरील सापळ्यात कोहली सापडला. त्यामुळे त्याला आपल्या तंत्रात सुधारणा करावी लागणार आहे. अन्यथा तिसऱ्या कसोटीत फलंदाजी करणे अधिक आव्हानात्मक ठरेल. भारतीय संघ २००२मध्ये हेडिंग्लेवर अखेरचा सामना खेळला होता. त्या सामन्यात भारताने एक डाव आणि ४६ धावांनी संस्मरणीय विजय मिळवला होता. त्याची पुनरावृत्ती करण्यासाठी भारत उत्सुक आहे.
साकिबला पदार्पणाची संधी
लॉर्ड्स कसोटीत वेगवान माऱ्याने भारतीय फलंदाजांना त्रस्त करणाऱ्या मार्क वूडने दुखापतीमुळे माघार घेतल्याने इंग्लंडच्या अडचणीत भर पडली आहे. त्यामुळे साकिब मेहमूदला पदार्पणाची संधी मिळू शकते. अनुभवी जेम्स अँडरसन तंदुरुस्त असल्याची ग्वाही रूटने दिली आहे. लॉर्ड्सवर उभय संघांमधील खेळाडूंमध्ये काही वाद उद्भवले. लीड्सवर असे अनावश्यक वाद टाळू, असे रूटने म्हटले आहे.
रोहित शर्मा आणि के. एल. राहुल या सलामीवीरांची कामगिरी भारताच्या धावसंख्येसाठी प्रेरक ठरत आहे. राहुलचा प्रत्येक डावागणिक आत्मविश्वास उंचावत आहे. रोहितसुद्धा लयीत आहे, परंतु चुकीच्या चेंडूवर पूलचा फटका खेळल्याने मालिकेत त्याचा दोनदा घात केला आहे चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांचे अपयश भारतासाठी चिंताजनक ठरत होते. परंतु लॉडर्समध्ये यांनी जवळपास ५० षटके किल्ला लढवून टीकाकारांना चोख उत्तर दिले आहे.
हेडिंग्लेमधील वातावरण हे थंड असल्यामुळे वेगवान गोलंदाजांचेच खेळपट्टीवर वर्चस्व दिसून येईल. या परिस्थितीत भारत वेगवान चौकडीचीच रणनीती आखून, पुन्हा रविचंद्रन अश्विनला विश्रांती देईल. शार्दूल ठाकूर दुखापतीतून सावरला असला तरी कोहली लॉडर्सवरील विजयी वेगवान माऱ्यात बदल करणार नाही. पहिल्या कसोटीत वगळलेल्या इशांत शर्माने लॉर्ड्सवर लक्ष वेधले. त्यामुळे अनुभवी इशांतला शार्दूलपेक्षा प्राधान्य दिले जाईल.


