महापालिकेच्या हद्दी लगत आणि विकासापासून वंचित असलेल्या हिंजवडी, माण, मारुंजी, जांबे, नेरे, सांगवडे, गहुंजे या सात गावांचा पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात समावेश करण्याची मागणी मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केली आहे. त्यावर मुख्यमंत्र्यांनी तात्काळ प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. त्यामुळे ही गावे लवकरच पालिकेत येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
महापालिका हद्दीलगत हिंजवडी, मारुंजी, नेरे, जांभे, सागंवडे, गहुंजे ही गावे आहेत. या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले आहे. त्याठिकाणी मुलभूत सुविधांचा अभाव आहे. माहिती व तंत्रज्ञाननगरी असलेल्या हिंजवडी, माणचा विकास होणे गरजेचे आहे. देशभरातील नागरिक या ठिकाणी वास्तव्यास आहेत. वाढत्या लोकसंख्येमुळे ग्रामपंचायतीला नागरिकांना सुविधा देणे शक्य होत नाही. सुविधांसाठी नागरिकांनी गावांचा महापालिकेत समावेश करण्याची मागणी केली आहे. या सात गावांचा महापालिकेत समावेश करण्याचा ठराव २०१५ मध्ये महापालिका सभेत झाला आहे. वाढते नागरीकरण, सुविधांचा अभाव, वाहतुकीची समस्या या गोष्टींचा विचार करून ही गावे महापालिकेत येण्याची आवश्यकता आहे. गहुंजेत आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम आहे. या गावात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प पुरेसे नसल्याने अशुद्ध पाणी थेट नदीपात्रात सोडले जाते. त्यामुळे पवना नदीचे प्रदूषण वाढले आहे.
गावांचा विकास, नागरिकांना सर्व सोयी-सुविधा मिळाव्यात आणि अनाधिकृत बांधकाम रोखण्याच्या दृष्टिकोणातून या सात गावांचा महापालिका क्षेत्रात समावेश होणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक विचार करून लवकरच निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले आहे. – श्रीरंग बारणे, खासदार