वार्षिक बाजार मूल्य दर म्हणजेच रेडी रेकनरचे दर प्रत्येक वर्षी १ एप्रिल रोजी जाहीर करण्यात येतात. त्यानुसार स्थावर व जंगम मालमत्तेचे सरासरी दर निश्चित करण्यात येतात.
यावर्षी क्रेडाई, विकासक व इतर सामान्य नागरिकांकडून जमीन व इमारत या मिळकतींच्या दरांमध्ये कोणतीही वाढ करण्यात येऊ नये अशी विनंती राज्य शासनास करण्यात येत होती. या निवेदनांचा सकारात्मक विचार करुन रेडी रेकनरच्या दरात कोणतीही वाढ करण्यात आली नसल्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी सांगितले.
करोनामुळे १ एप्रिल २०२० ऐवजी सप्टेंबर २०२० मध्ये रेडीरेकनर दरात वाढ करण्यात आली होती. त्यानंतर गेल्या वर्षी म्हणजेच सन २०२१-२२ या आर्थिक वर्षात रेडीरेकनरचे दर ‘जैसे थे’ ठेवण्यात आले होते. करोनामुळे राज्याची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने गेल्या वर्षी (२०२२-२३) राज्यात रेडीरेकनर दरात घसघशीत वाढ करत राज्य सरकारने नागरिकांना धक्का दिला होता. आगामी निवडणुका विचारात घेऊन राज्य सरकारने रेडी रेकनरच्या दरात कोणताही बदल केलेला नाही रेडी रेकनरमध्ये कोणताही बदल न केल्यामुळे गेल्यावर्षीचेच दर आगामी वर्षभरासाठी लागू होणार असल्याने उच्चभू लोकवस्ती असलेला कोरेगाव पार्क परिसर हा सर्वांत महागडा असणार आहे. त्या खालोखाल प्रभात रस्त्याचे दुसरे स्थान कायम आहे. त्यानंतर भांडारकर रोड, लॉ कॉलेज रोड, बोट क्लब, जंगली महाराज रस्ता, कर्वेरोड फर्ग्युसन रोड हेदेखील महागड्या परिरसराच्या रांगेत आहेत.
येत्या आर्थिक वर्षात म्हणजेच सन २०२३-२४ च्या वार्षिक दर विवरणपत्र दरात कोणताही बदल न करता ते मागील वर्षाप्रमाणेच कायम ठेवण्यात आले आहेत. रेडी रेकनरचे दर स्थिर ठेवल्यामुळे मालमत्ता खरेदी व विक्री करणाऱ्या दोघांनाही फायदा होतो. सामान्य नागरिकांना घर खरेदी करण्यास प्रोत्साहन मिळते. तसेच बांधकाम व्यावसायिक, घरकुल विकासक, रिअल इस्टेटमध्ये काम करणारे मध्यस्थ, वकिल व सल्लागार आणि स्थावर मालमत्ता धारकांच्या व्यवसायात उत्साहाचे वातावरण निर्माण होऊन खरेदी-विक्रीस चालना मिळते. त्यामुळे एकूणच अर्थव्यवस्थेला चालना मिळते. या बाबी विचारात घेऊन शासनाने सन 2023-24 च्या रेडी रेकनरच्या दरात कोणतीही वाढ केली नसल्याचे श्री. विखे- पाटील यांनी सांगितले.