मसाप पिंपरी चिंचवड शाखेतर्फे आयोजित सत्कार सोहळ्यात प्रतिपादन
विवेकाचा आवाज हा समाजाचा आवाज असतो. सध्या चिंता वाटावी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. समाजात संभ्रम निर्माण होत आहे अशावेळी समाजाचा आरसा असणाऱ्या लेखकांनी विवेकाचा आवाज ऐकलाच पाहिजे आणि ती आजच्या काळाची नितांत गरज आहे असे विचार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कथाकार भारत सासणे यांनी व्यक्त केले.
उदगीर येथे होणाऱ्या ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याच्या सन्मानार्थ महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड च्या वतीने शाखेचे अध्यक्ष राजन लाखे यांच्या हस्ते त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. त्यावेळी कार्याध्यक्षा विनीता ऐनापुरे, उपाध्यक्षा डॉ. रजनी शेठ, सचिव संजय जगताप, कार्यकारिणी सदस्य माधुरी मंगरुळकर, किशोर पाटील, विविध संस्थांचे प्रतिनिधी माधव राजगुरु, प्रा. अशोक पगारिया, संपत गर्जे, डी. बी शिंदे, अविनाश कांबीकर, प्रशांत थोरात आदी उपस्थित होते.
सत्कारात मसाप पिंपरी चिंचवड शाखेने त्यांना भेट दिलेल्या लेखणीचा उल्लेख करुन सासणे पुढे म्हणाले जो कोणी संमोहनातून जागृत करण्याचा प्रयत्न करतो तो काही दुष्ट प्रवृत्तींना आवडत नसतो. कोंबडा पहाटे जागृत करण्याचे काम करतो, तो सर्वाधिक मारल्या जातो हे ध्यानात ठेवले पाहिजे. लेखकाने भीती न बाळगता आपल्या लेखणीने जागृती निर्माण केली पाहिजे आणि अंधारातील सत्य उलगडले पाहिजे जे मी माझ्या लिखाणातून करत आलो आहे. आपल्याकडे वैचारिक परंपरा आहे तेंव्हा विचार करुन आपला वैचारिक धर्म पाळला पाहिजे असे माझे ठाम मत आहे असे प्रतिपादन करुन संमेलनाध्यक्ष या नात्याने गावोगावी जाऊन वैचारिक पेरणी करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
राजन लाखे यांनी आपल्या मनोगतात सासणे यांच्या साहित्य ग्रंथसंपदेचा तसेच साहित्यिक प्रवासाचा आढावा घेऊन, अस्वस्थता, कलात्मकता आणि वैचारिकता यांचा सुरेख मेळ सासणे यांच्या समग्र वांगमयात कसा झाला आहे हे आपल्या शैलीने रसिकांना उलगडून दाखविले.संमेलनात बालसाहित्यावर परीसंवाद होण्याची गरज, मराठीवर हिंदीचा प्रभाव, वाचन संस्कृती लोप पावत चालल्याची खंत या संबंधात राजगुरु, प्रकाश निर्मळ, सुरेखा कटारिया यांनी विचारलेल्या प्रश्नांना सासणे यांनी मोकळेपणाने प्रभावी उत्तरे दिली.
सदर समारंभात पिंपरी चिंचवड मधील विविध संस्थाचा वतीनेही त्यांचा सत्कार करण्यात आला. कटारिया यांची ध्वनिफीत तसेच मराठी साहित्य व कला मंडळाच्या साहित्य दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले आणि उपस्थित प्रत्येकाला सदर दिनदर्शिका भेट देण्यात आली.श्रीकांत चौगुले यांनी सूत्र संचालन केले. संजय जगताप यांनी आभार मानले.