Wednesday, June 18, 2025
Homeताजी बातमीजगभरात नावाजलेल्या ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवा’च्या स्वरयज्ञास आजपासून सुरुवात

जगभरात नावाजलेल्या ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवा’च्या स्वरयज्ञास आजपासून सुरुवात

अभिजात संगीताच्या प्रांतामध्ये जगभरात नावाजलेल्या ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवा’च्या स्वरयज्ञास बुधवारपासून (१४ डिसेंबर) सुरुवात होत आहे. करोना प्रादुर्भावाच्या निर्बंधांमुळे तीन वर्षांनंतर होणाऱ्या महोत्सवानिमित्ताने पाच संगीत श्रवणानंदाची अनुभूती घेण्यासाठी कानसेन रसिकांसह कलाकारही उत्सुक झाले आहेत. महोत्सवाची …. तयारी पूर्णत्वास गेली असून आता सर्वांनाच बुधवारी दुपारी चार वाजण्याची प्रतीक्षा आहे.

करोना प्रादुर्भावाच्या निर्बंधांमुळे आर्य संगीत प्रसारक मंडळाला दोन वर्षे महोत्सवाचे आयोजन करता आले नाही. त्यामुळे स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी यांचे जन्मशताब्दी वर्ष यंदाच्या महोत्सवात साजरे केले जात आहे. त्यासाठी महाराष्ट्रीय मंडळाच्या क्रीडासंकुलामध्ये महोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. तीन वर्षांनी या महोत्सवाचा आनंद लुटण्याची संधी लाभल्यामुळे रसिकांसह कलाकारांनाही आपल्या कलाविष्काराची उत्कंठा लागली आहे.

यावर्षीच्या महोत्सवात स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी यांची जन्मशताब्दी साजरी होत असल्याने एक वेगळीच झळाळी महोत्सवाला लाभणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून जुन्या पिढीतील प्रसिद्ध प्रकाशचित्रकार वा. ना. भट यांनी पं. भीमसेन जोशी यांच्या तरुणपणी काढलेले तब्बल १८ फूट उंचीचे व्यक्तिचित्र रसिकांना पाहायला मिळेल, अशी माहिती मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी दिली. महोत्सवाला जोडून शिवाजीनगर येथील सवाई गंधर्व स्मारक येथे सकाळी अकरा वाजता होणाऱ्या उपक्रमात संगीतमार्तंड पं. जसराज यांच्या आठवणींना त्यांची कन्या दुर्गा जसराज आणि भाचे व शिष्य पं. रतन मोहन शर्मा उजाळा देणार आहेत.जन्मशताब्दीचे औचित्य साधून पं. भीमसेन जोशी यांचे ज्येष्ठ शिष्य पं. उपेंद्र भट यांच्या गायनाने यंदाच्या महोत्सवाची दुपारी चार वाजता सुरुवात होणार आहे. त्यानंतर ग्वाल्हेर घराण्याच्या शाश्वती मंडल आणि संगीतमार्तंड पं. जसराज यांचे शिष्य पं. रतनमोहन शर्मा यांचे गायन होईल. उस्ताद अमजद अली खाँ यांच्या सरोदवादनाने पहिल्या सत्राची सांगता होणार आहे.

महोत्सवासाठी येणाऱ्या रसिकांच्या दुचाकी व चारचाकी गाड्यांसाठी सुसज्ज पार्किंग, कार्यक्रमाचा आस्वाद रसिक प्रेक्षकांना घेता यावा यासाठी नेहमीप्रमाणे मोठे एलईडी पडदे लावण्यात आले आहेत. पीएमपीएमएल तर्फे कार्यक्रम संपल्यानंतर विशेष बससेवा संगीत रसिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली असून पुण्यातील रिक्षा संघटनांतर्फे देखील रसिकांना अपेक्षित स्थळी पोहोचविण्यासाठी मदत देण्यात येईल, असे आश्वासन दिले असल्याचे जोशी यांनी सांगितले.
महोत्सवात आज
पं. उपेंद्र भट (गायन)
शाश्वती मंडल (गायन)
पं. रतन मोहन शर्मा (गायन)
उस्ताद अमजद अली खाँ (सरोदवादन)

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments