पिंपळे निलख येथे १०० फूट उंच तिरंगा फडकणार
माजी नगरसेविका आरती चोंधे यांचा पाठपुरावा
पिंपळे निलख येथील रक्षक चौकात बीआरटीएस रस्त्यालगत मिलीटरी हद्दीत १०० फूट उंच भारतीय ध्वज तिरंगा फडणवण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या ध्वजस्तंभाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर सदर काम लवकर पूर्ण करावे, अशी सूचना माजी नगरसेविका आरती चोंधे यांनी केली आहे.
केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाकडून परवानगी मिळाल्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून या ध्वजस्तंभाचे काम सुरू करण्यात आले. या कामाची पाहणी सोमवारी माजी नगरसेविका आरती चोंधे यांनी केली. यावेळी महापालिका स्थापत्य विभागाचे उपअभियंता विनय ओव्हाळ, कनिष्ठ अभियंता प्राजक्ता गव्हाणे, विद्युत विभागाचे कनिष्ठ अभियंता महेश कावळे आदी उपस्थित होते.
माजी नगरसेविका आरती चोंधे म्हणाल्या की, औंध मिलिटरी कॅम्प येथील भारतीय लष्करातील जवान आणि स्थानिक नागरिकांकडून गेल्या अनेक दिवसांपासून रक्षक चौक येथे तिरंगा उभारावा, अशी मागणी होत होती. त्यानुसार आम्ही महापालिका प्रशासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला. त्यानुसार महापालिका प्रशासनाच्या वतीने मिलीटरी हेड क्वार्टर ३३० इनफॅन्ट्री ब्रिगडचे कर्नल लेफ्टनंट यांच्याकडे प्रस्ताव पाठवला होता. याबाबत महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनीही सकारात्मक भूमिका घेतली. त्यामुळे रक्षक चौकामध्ये १०० फूट उंच भारतीय ध्वज कायमस्वरुपी फडकविण्यास परवागनी मिळाली आहे. ध्वजस्तंभाचे काम आता अंतिम टप्प्यात आहे.
तमाम भारतीयांना तिरंगा ध्वजाचा अभिमान…
भारतीय राष्ट्रध्वज तिरंगा बाबत तमाम भारतीयांना अभिमान आहे. राष्ट्रभक्तीचा प्रतिक असलेला हा ध्वज पिंपळे निलख भागात सदैव फडकत रहावा, अशी नागरिकांची मागणी होती. त्यासाठी लष्कराच्या हद्दीतील रक्षक चौकात १०० फूट उंच ध्वजस्तंभ उभारण्याचे काम सुरू करण्यात आले. पिंपळे निलखवासीयांसाठी निश्चितच ही अभिमानाची बाब आहे. या ध्वजाचे काम प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर लवकर करावे, अशी सूचना महापालिका प्रशासनाला केली आहे, असे माजी नगरसेविका आरती चोंधे यांनी सांगितले.