१४ डिसेंबर २०२०,
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा बंगल्यासह अनेक मंत्र्यांची शासकीय निवासस्थानाची पाणीपट्टी थकली असल्याची माहिती समोर आली आहे. पाणीपट्टीची ही रक्कम २४ लाख ५६ हजार ४६९ इतकी आहे. आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी काढलेल्या माहितीच्या अधिकारातून ही माहिती उघड झाली आहे. यामुळे मुंबई महापालिकेने वर्षा बंगला डिफॉल्टर यादीत टाकला आहे. दरम्यान सर्वमान्यांप्रमाणे मंत्र्यांवरही कारवाई केली जाणार का ? असा प्रश्न विचारला जात आहे.
आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर पाण्याच्या थकबाकीदारांची माहिती गोळा केली होती. यावेळी मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांच्या शासकीय आवासावर पाण्याच्या एकूण २४ लाख ५६ हजार ४६९ थकबाकी असल्याचं समोर आलं.
माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वर्षा बंगला, मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षाकर्मचाऱ्यांसाठीचा तोरणा बंगला, अर्थमंत्री अजित पवार यांचा देवगिरी, जयंत पाटील यांचा सेवासदन, ऊर्जा मंत्री नितीन राउत यांचा पर्णकुटी, राजेश टोपे यांचा जेतवन आदी बंगल्यांची पाणीपट्टी थकली आहे. यामध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचाही समावेश आहे.