Tuesday, July 16, 2024
Homeमहाराष्ट्र"प्रेयसी" या छायाचित्र प्रदर्शनातून कलावंताचे वेगळेपण प्रकट - गुरू ठाकूर

“प्रेयसी” या छायाचित्र प्रदर्शनातून कलावंताचे वेगळेपण प्रकट – गुरू ठाकूर

सुप्रसिद्ध छायाचित्रकार देवदत्त कशाळीकर यांच्या छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन

कलावंत आणि सामान्य माणसात फरक असतो, यातील कलावंताचे वेगळेपण प्रसिद्ध छायाचित्रकार देवदत्त कशाळीकर यांच्या “प्रेयसी” या छायाचित्र प्रदर्शनातून पाहायला मिळते असे प्रतिपादन सुप्रसिद्ध गीतकार, कवी गुरु ठाकूर यांनी केले.
देवदत्त कशाळीकर यांच्या प्रेयसी या छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन सोमवारी (दि. १२) ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक महेश कुडाळकर, कलारंग प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमित गोरखे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, महानगरपालिकेतील निवृत्त अधिकारी प्रवीण तुपे, सकाळ समूह संपादक सम्राट फडणीस, ज्येष्ठ पत्रकार जयंत जाधव, विवेक इनामदार, विश्वास मोरे, गोविंद वाकडे, नाझीम मुल्ला, कैलास पुरी, मिलिंद भुजबळ आयोजक देवदत्त आणि वर्षा कशाळीकर आदी उपस्थित होते. बुधवार (दि.१४ फेब्रुवारी) पर्यंत सकाळी दहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत हे प्रदर्शन सर्व कला रसिकांना विनामूल्य पाहण्यास मिळणार आहे.

गुरू ठाकूर म्हणाले की, उत्कृष्ट कलाकृती पाहिल्यावर दुसऱ्याला काहीतरी करण्याची प्रेरणा देते अशा सर्वोत्तम फोटोचे प्रदर्शन “प्रेयसी” हे सर्वांनी आवर्जून पाहिले पाहिजे. मी या फोटोंना कविता दिल्या आहेत, त्याचे खरे श्रेय हे देवदत्त मध्ये असलेल्या कलाकाराचे आहे. प्रत्येकाने आपल्या हृदयातील नाजूक कप्प्यात प्रेयसीची आवडती प्रतिमा चिरंतन जपलेली असते. ती त्यांच्या कल्पनेतून आणि कॅमेरातून टिपली आहे. ही प्रेयसी आणि निसर्ग यांचं नातं छायाचित्र प्रदर्शनातून कला रसिकांना मंत्रमुग्ध करणारी आहे. चेहऱ्याच्या पलीकडे जाऊन पण सौंदर्य आणि सृजनतेची एक परिभाषा असते. अशी मनाला भुरळ घालणारी छायाचित्रे आपल्या हृदयाशी संवाद साधतात अशा शब्दात ठाकूर यांनी शुभेच्छा दिल्या.
सम्राट फडणीस यांनी शुभेच्छा देताना सांगितले की, हे प्रदर्शन महाराष्ट्रातील सर्व शहरांमध्ये झाले पाहिजे.
‘नको जाऊ पाठीवर
केस सोडून मोकळे
जुन्या आठवात काही
आहे अजून कोवळे
पुन्हा तुझ्या केसातच
गुरफटेल जीव पिसा
पुन्हा निघून जाता

त्याला सोडवावा कसा ?’ अशा हृदयाचा ठाव घेणाऱ्या कविता गुरु ठाकूर यांनी या छायाचित्रांना दिल्या आहेत. ‘प्रेयसी’ या संकल्पनेला मूर्त रूप देण्यासाठी देवदत्त कशाळीकर यांनी महाराष्ट्र, लडाख, कर्नाटक, गोवा, गुजरात, उत्तर प्रदेशात जाऊन थंडी, ऊन, वारा, पाऊस अगांवर झेलत छायाचित्रे टीपली आहेत. स्पेशल आरकईव्ह अशा कॅनव्हास वर सप्तरंगाची मुक्त उधळण करीत अतिशय सुंदर कलाविष्कार असणारी ६० पेक्षा जास्त छायाचित्र या प्रदर्शनात आहेत. प्रवीण तुपे, अमित गोरखे यांनीही शुभेच्छा दिल्या.

या प्रदर्शनास भेट देणाऱ्या कला रसिकांनी ड्रॉप बॉक्स मध्ये आपल्या आवडत्या फोटो फ्रेमचा क्रमांक द्यावा. एकूण ड्रॉप बॉक्स मधील तीन भाग्यवान रसिकांना या प्रदर्शनातील मूळ फ्रेम १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी प्रदर्शन स्थळी रात्री नऊ वाजता भेट देण्यात येईल अशी माहिती वर्षा कशाळीकर यांनी दिली. प्रास्ताविक देवदत्त कशाळीकर, सूत्र संचालन अमृता प्रकाश तर आभार वर्षा कशाळीकर यांनी मानले.

देवदत्त कशाळीकर यांना भारत सरकार चा युवक कल्याण मंत्रालयचा पुरस्कार आणि महाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार प्राप्त पुणे जिल्ह्यातील फोटोग्राफर आहे. तसेच निकॉन पुरस्कार, कॅनन पुरस्कार, जगदीश खेबूडकर पुरस्कार, मोरया पुरस्कार, टाइम्स ऑफ इंडिया पुरस्कार, वसुंधरा फिल्म पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. मागील २८ पेक्षा जास्त वर्षे फोटोग्राफी क्षेत्रात कामकाज, पिंपरी चिंचवड महानगपालिका आस्थापनेवरील प्रसिद्धी विभागासाठी २० वर्षे काम केले आहे.आजवर महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेर अनेक विषयावर फोटोग्राफी प्रदर्शने आयोजित केली आहे.फोटोग्राफी प्रदर्शने आयोजित केली आहे. सध्या डॉक्यूमेण्ट्री, फिल्म मेकिंग प्रकारात कार्यरत आहेत. अनेक नामवंत वृत्तसंस्था, नामांकित चॅनल साठी फोटो जर्नलिस्ट म्हणून काम करत आहेत. अतुल्य भारत या विषयावर पूर्ण भारताचे सांस्कृतिक चित्रीकरण करण्याचा त्यांचा प्रकल्प सुरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments