Tuesday, December 10, 2024
Homeताजी बातमीलावणीची अनभिषिक्त सम्राज्ञी काळाच्या पडद्याआड; सुलोचना चव्हाण यांचं निधन..

लावणीची अनभिषिक्त सम्राज्ञी काळाच्या पडद्याआड; सुलोचना चव्हाण यांचं निधन..

महाराष्ट्राच्या लावणीसम्राज्ञी ज्येष्ठ पार्श्‍वगायिका सुलोचना चव्हाण यांचं आज १० डिसेंबर रोजी वृद्धापकाळाने निधन झालं. त्या ९२ वर्षांच्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. अखेर आज दुपारी १२ च्या सुमारास फणसवाडी येथील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पश्चात धाकटा मुलगा, सून, मोठ्या मुलाची पत्नी, नातवंडे असा परिवार आहे.

१३ मार्च १९३३ रोजी मुंबईत त्यांचा जन्म झाला. आज संध्याकाळी मरिन लाइन्स येथे अंत्यसंस्कार होणार आहे. ‘फड सांभाळ तुऱ्याला गं आला…’ ‘पाडाला पिकलाय आंबा..’ ‘मला म्हणत्यात पुण्याची मैना’ यांसारख्या एकाहून एक लावण्या सुलोचना चव्हाण यांनी आपल्या खर्जातल्या आवाजाच्या जादूने ठसकेबाज केल्या. याच वर्षी त्यांचा पद्मश्री पुरस्काराने सन्मान करण्यात आला होता. तेव्हा व्हिलचेअरवर बसूनच त्यांनी तो स्वीकारला होता. तेव्हापासून सुलोचना यांची प्रकृती फारशी चांगली नसल्याचं दिसलं होतं. यानंतर त्या कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमातही दिसल्या नाहीत.

सुलोचना कदम असे त्यांचे माहेरचे नाव. त्यांचे शालेय शिक्षण चौथीपर्यंत झाले. त्यांनी लहानपणी मेळ्यांपासून श्रीकृष्णाची भूमिका करायला सुरुवात केली. त्यानंतर त्या उर्दू नाटकांमध्ये मजनूचीही भूमिका करायच्या. वयाच्या दहाव्या वर्षापासून त्यांनी गायला सुरुवात केली. लग्नाआधी त्यांनी सुमारे ७० चित्रपटांमध्ये पार्श्वगायन केले होते. त्यावेळी के. सुलोचना म्हणूनही त्या पार्श्वगायन क्षेत्रात होत्या.

त्यांनी आचार्य अत्रे यांच्या हीच माझी लक्ष्मी या चित्रपटासाठी पार्श्वगायन केले. हा मराठीतील त्यांचा पहिला चित्रपट. त्यानंतर सन १९५२ मध्ये त्यांनी शाम चव्हाण यांच्या कलगीतुरा या चित्रपटासाठी लावणी गायन केले. चव्हाण यांनीच सुलोचना कदम यांना लावणी गायन शिकवले. शब्दफेक, स्वरातील चढ उतार याची त्यांना जाणीव करून दिली. त्यानंतर सन १९५३ मध्ये सुलोचना कदम यांचा शाम चव्हाण यांच्याशी विवाह झाला आणि त्या सुलोचना चव्हाण झाल्या.

सुलोचना चव्हाण यांना गंगा-जमना पुरस्कार, महाराष्ट्र सरकारचे दोन जीवनगौरव पुरस्कार, पुणे महापालिकेतर्फे सन २००९ चा राम कदम पुरस्कार, सन २०११ चा महाराष्ट्र सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार अशा पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments