Monday, June 15, 2026
Homeअर्थविश्वफुगेवाडीतील विषारी दारूकांडाने प्रशासनाचा मुखवटा फाडला..!!

फुगेवाडीतील विषारी दारूकांडाने प्रशासनाचा मुखवटा फाडला..!!

केवळ पिवळे दिवे, स्मार्ट रस्ते, डिजिटल बोर्ड, कोट्यवधींच्या विकासकामांच्या जाहिराती आणि ‘स्मार्ट सिटी’चे गोंडस स्वप्न… पण फुगेवाडीतील विषारी गावठी दारूकांडाने या सगळ्या दिखाव्याचा फुगा एका क्षणात फोडून टाकला आहे. ज्या शहराला देशातील सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या शहरांपैकी एक म्हणून मिरवले जाते, त्याच शहरात अवैध हातभट्ट्यांमधून तयार होणाऱ्या विषारी दारूमुळे तब्बल १८ हून अधिक नागरिकांचा बळी जातो, ही केवळ दुर्घटना नाही; हा प्रशासनाच्या अपयशाचा आणि भ्रष्ट व्यवस्थेचा जाहीरनामा आहे.

बुधवारी एक, गुरुवारी आठ आणि शुक्रवारी चार… मृत्यूंची ही भयावह मालिका सुरू असताना प्रशासन मात्र झोपेचे सोंग घेत होते.

शहरात हातभट्ट्यांचे साम्राज्य आणि प्रशासनाची मूक साथ

फुगेवाडी, दापोडी, सांगवी, पिंपळे गुरव, नदीकाठची क्षेत्रे आणि शहराच्या उपनगरांमध्ये हातभट्ट्यांचे जाळे वर्षानुवर्षे सुरू आहे. या भट्ट्यांमध्ये युरिया, रासायनिक द्रव्ये आणि मानवी आरोग्यास घातक पदार्थ मिसळून तयार होणारे विष खुलेआम विकले जाते. हा धंदा रातोरात उभा राहत नाही. त्यासाठी जागा लागते, वाहतूक लागते, विक्रीचे जाळे लागते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रशासनाची डोळेझाक लागते.

महापालिकेचे अतिक्रमण विभाग, क्षेत्रीय अधिकारी, आरोग्य विभाग आणि स्थानिक यंत्रणा रोज त्याच भागातून फिरतात. मग या हातभट्ट्या त्यांना दिसत नाहीत का? की काहींच्या खिशात जाणाऱ्या पैशांमुळे त्यांची दृष्टीच अधू झाली आहे?

पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाची जबाबदारी कुठे गेली?

अवैध दारूविक्री रोखण्यासाठी स्वतंत्र पोलीस यंत्रणा आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी आहेत. नियमित गस्त, माहितीदारांचे जाळे आणि कारवाईची यंत्रणा आहे. मग एवढ्या मोठ्या प्रमाणावर विषारी दारू विकली जात असताना हे विभाग नेमके काय करत होते?

प्रत्येक दुर्घटनेनंतर काही छापे, काही गुन्हे आणि काही अटकांची प्रसिद्धी केली जाते. पण काही दिवसांनी त्याच ठिकाणी पुन्हा हातभट्ट्या सुरू होतात. याचा अर्थ कारवाई ही केवळ दिखाऊ असते की त्यामागे आणखी काही ‘अर्थपूर्ण’ कारणे आहेत?

नागरिकांचा संतप्त सवाल सरळ आहे—जर प्रशासन प्रामाणिक असेल, तर बंद केलेले अड्डे पुन्हा सुरू कसे होतात?

ही दुर्घटना नाही, ही व्यवस्थेची सामूहिक चूक आहे

प्रत्येक मृत व्यक्तीच्या मागे उद्ध्वस्त झालेले कुटुंब आहे. अनाथ झालेली मुले आहेत. विधवा झालेल्या महिला आहेत. त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या या विषारी दारूच्या साखळीत फक्त भट्टीचालक दोषी नाहीत. वेळेत कारवाई न करणारे अधिकारी, तक्रारींकडे दुर्लक्ष करणारी यंत्रणा आणि अशा धंद्यांना राजकीय संरक्षण देणारे घटक यांनाही तितकेच जबाबदार धरले पाहिजे.

आज जर फुगेवाडीत १८ हून अधिक मृत्यू झाले असतील, तर उद्या ही संख्या आणखी वाढणार नाही याची हमी कोण देणार?

• फुगेवाडी परिसरातील हातभट्ट्यांबाबत मागील पाच वर्षांत किती तक्रारी झाल्या?

• किती गुन्हे दाखल झाले?

• किती अधिकारी जबाबदार धरले गेले?

• कारवाईनंतरही अड्डे पुन्हा सुरू कसे झाले?

• या विषारी साखळीमागील राजकीय आणि प्रशासकीय पाठीराखे कोण?

जोपर्यंत या प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई होत नाही, तोपर्यंत फुगेवाडीतील मृत्यूंचे पाप केवळ दारू विक्रेत्यांवर नव्हे, तर संपूर्ण प्रशासनावर राहणार आहे.

स्मार्ट सिटीच्या चमकदार जाहिरातींपेक्षा नागरिकांचा जीव अधिक मौल्यवान आहे. फुगेवाडीतील मृत्यूंनी एक गोष्ट स्पष्ट केली आहे—शहर स्मार्ट असण्यापूर्वी सुरक्षित असणे गरजेचे आहे. अन्यथा ‘स्मार्ट सिटी’ ही केवळ फलकावरील अक्षरे ठरतील आणि वास्तवात नागरिक मृत्यूच्या सावटाखाली जगत राहतील.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments