Sunday, June 15, 2025
Homeआरोग्यविषयकदेशात करोनाची तिसरी लाट; करोना टास्क फोर्सच्या प्रमुखांचं मोठं विधान

देशात करोनाची तिसरी लाट; करोना टास्क फोर्सच्या प्रमुखांचं मोठं विधान

करोनाची तिसरी लाट आलेली असताना देशात नोंदवण्यात आलेली सर्वाधिक ओमायक्रॉन प्रकरणं मोठ्या शहरांमधील असल्याचं देशाच्या लस टास्क फोर्सच्या प्रमुखांनी सांगितलं आहे. देशात करोनाची तिसरी लाट जवळपास आली असल्याचंही यावळी ते म्हणाले. नोव्हेंबर महिन्यात सर्वात प्रथम दक्षिण आफ्रिकेत ओमायक्रॉनचा रुग्ण आढळला होता. त्यानंतर वेगाने संसर्ग होणाऱ्या ओमायक्रॉनच्या रुग्णांमधील ७५ टक्के रुग्ण मुंबई, दिल्ली आणि कोलकाता अशा मोठ्या शहरांमधील असल्याचं डॉक्टर एन के अरोरा यांनी एनडीटीव्हीशी बोलताना सांगितलं आहे.

“जिनोम सिक्वेन्सनुसार तुम्ही व्हेरियंटकडे पाहिलंत तर डिसेंबर महिन्यातील पहिल्या आठवड्यात पहिल्या व्हायरसची नोंद झाली. गेल्या आठवड्यात देशात एकूण १२ ओमायक्रॉनचे रुग्ण सापडले असून ते आता २८ टक्क्यांवर पोहोचले आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणात करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. यात महत्वाचं म्हणजे मुंबई, कोलकाता आणि खासकरुन दिल्ली अशा मोठ्या शहरांमधील रुग्णसंख्या जास्त असून ७५ टक्क्यांहून अधिक आहे,” अशी माहिती डॉक्टर अरोरा यांनी दिली आहे. डॉक्टर अरोरा राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाचे चेअरमनदेखील आहेत.

भारतात आतापर्यंत १७०० ओमायक्रॉन रुग्णांची नोंद झाली असून यामधील सर्वाधिक महाराष्ट्रात असून ५१० रुग्ण आढळले आहेत. यासोबत देशातील करोना रुग्णसंख्येत २२ टक्क्यांची वाढ पहायला मिळाली आहे. यामुळे डॉक्टर अरोरा यांनी देशात करोनाची तिसरी लाट जवळपास आली असल्याचं म्हटलं आहे.

“देशात करोनाची तिसरी लाट आल्याचं स्पष्ट दिसत आहे. करोनाचा नवा व्हेरियंट यासाठी जबाबदार असून सध्या तरी तो ओमायक्रॉन आहे,” असं यावेळी त्यांनी सांगितलं. डॉक्टर अरोरा यांनी यावेळी १५ ते १८ वर्षातील वयोगटातील मुलांना देण्यात येणारी लस असुरक्षित असल्याचा दावा फेटाळला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments