मराठी चित्रपट रसिकांच्या प्रेमामुळेच तसेच पाठिंब्यामुळे माझ्या चित्रपटांना यश मिळाले असे अभिनेते आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी गप्पांच्या दरम्यान सांगितले. रसिकांच्या भावना महत्त्वाच्या आहेत असे ही ते म्हणाले.
पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ प्रेक्षागृहात आयोजित १८ व्य जागतिक मराठी संमेलनात ‘देऊळबंद ते सरसेनापती हंबीरराव – एक प्रवास’ या विषयावर ते बोलत होते. विनोद सातव यांनी त्यांना गप्पांच्या माध्यमातून बोलते केले. यावेळी अभिनेते देव गिल हे मंचावर उपस्थित होते. गोव्याचे सांस्कृतिक मंत्री गोविंद गावडे यांच्या हस्ते प्रवीण तरडे, देव गिल आणि विनोद सातव यांचा स्मृतिचिन्ह, उपरणे व रोपटे देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती व या संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील, उपाध्यक्ष गिरीश गांधी, जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे मंचावर उपस्थित होते.
तरडे यांनी महाविद्यालयीन जीवनातून सुरु झालेला रंगमंचावरील प्रवास, चित्रपटाची निर्मिती, प्रेक्षकांनी वेळोवेळी दिलेला पाठिंबा आणि चित्रपटनिर्मिती मध्ये आलेल्या अडचणी याविषयी सविस्तर संवाद साधला. प्रेक्षकांनी देखील टाळ्यांच्या कडकडाटात उत्स्फूर्त दाद दिली. ‘देऊळबंद’, ‘मुळशी पॅटर्न’ आणि ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटांची वाटचाल अतिशय रंजकपणे मांडली . एक महत्त्वाची बाब म्हणजे माझ्या मातीचा प्रश्न चित्रपटाच्या माध्यमातून रसिकांसमोर मांडता आला याचा नक्कीच आनंद आहे. ‘मुळशी पॅटर्न’ हा चित्रपट मराठीमध्ये प्रदर्शित झाला पण त्यांनतर सुमारे १४ भाषांमध्ये चित्रपट प्रदर्शित झाला. सुरुवातीला कमी प्रतिसाद होता. पण, नंतर मात्र रसिकांनी भरभरून प्रेम दिले. ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटात भव्यता आणि भरपूर तंत्रज्ञान याचा उपयोग करण्यात आला आहे. तसेच ‘देऊळबंद’ हा माझा पहिला चित्रपट! या चित्रपटाची वाटचाल करताना अनेक अनुभव आले. नवीन तंत्रज्ञानाचा अभ्यास केला, असे ते म्हणाले. चित्रपटाच्या बरोबरीने मालिकांसाठी स्वतंत्र लेखनही केले आणि या मालिकादेखील प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्या. असे ते म्हणाले.
मी महाविद्यालयात शिकत असताना कबड्डी आणि सॉफ्ट बॉल क्रीडा प्रकारातला राष्ट्रीय खेळाडू होतो. पण नाट्यक्षेत्राकडे वळेन असे वाटले नव्हते. पण योगायोगाने काही घटना घडल्या आणि ‘पुरुषोत्तम करंडक’ स्पर्धेतील नाटकाच्या लेखनाचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले, असे ते म्हणाले. अभिनेते देव गिल यांनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठी भाषेतून केली तेव्हा रसिकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. ते म्हणाले, या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मला मिळाली याचा आनंद आहे तरडे. यांच्याबरोबर काम करता आले आणि भविष्यातदेखील त्यांच्या बरोबर काम करण्याची माझी इच्छा आहे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा माझ्यावर प्रभाव आहे असे ते म्हणाले. या कार्यक्रमास प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती.