Sunday, July 20, 2025
Homeताजी बातमी१८ व्या लोकसभेचं अध्यक्षपद एनडीएकडेच, ओम बिर्ला यांची लोकसभा अध्यक्षपदी निवड..

१८ व्या लोकसभेचं अध्यक्षपद एनडीएकडेच, ओम बिर्ला यांची लोकसभा अध्यक्षपदी निवड..

अठराव्या लोकसभेच्या अध्यक्षपदी भाजपा खासदार ओम बिर्ला यांची निवड झाली आहे. लोकसभा अध्यक्षपदासाठी आज एनडीएचे उमेदवार ओम बिर्ला आणि इंडिया आघाडीचे उमेदवार के. सुरेश यांच्यामध्ये निवडणूक झाली. त्यामध्ये ओम बिर्ला यांनी आवाजी मतदानामध्ये विजय मिळवल्याचे हंगामी अध्यक्ष भर्तृहरी महताब यांनी जाहीर केले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी त्यांना सन्मानाने लोकसभा अध्यक्षांच्या आसनाकडे नेत स्थानापन्न केलं.

आज सकाळी ११ वाजता लोकसभेच्या सभागृहाच्या कामकाजाला सुरुवात झाल्यावर लोकसभेचे हंगामी अध्यक्ष भर्तृहरी महताब यांनी लोकसभा अध्यक्षांच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात केली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओम बिर्ला यांची लोकसभा अध्यक्षपदी निवड करण्याचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला राजनाथ सिंह यांच्यासह भाजपाचे इतर ज्येष्ठ नेते मित्र पक्षांमधील सहकाऱ्यांनी अनुमोदन दिले. तर विरोधकांच्या इंडिया आघाडीकडून के. सुरेश यांची लोकसभा अध्यक्षपदी निवड करण्याचा प्रस्ताव मांडला. त्याला इंडिया आघाडीतील प्रमुख नेत्यांनी अनुमोदन दिले.

त्यानंतर लोकसभेच्या हंगामी अध्यक्षांनी आवाजी मतदान घेत त्यामध्ये ओम बिर्ला हे विजयी झाल्याची घोषणा केली. त्यानंतर मतविभाजनाची करण्यात आली. मात्र ती मागणी लोकसभा अध्यक्षांनी फेटाळून लावली. ओम बिर्ला यांच्या निवडीची औपचारिक घोषणा झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि मंत्री किरेन रिजीजू यांनी बिर्ला यांना सन्मानपूर्वक लोकसभा अध्यक्षांच्या स्थानावर विराजमान केले.

ओम बिर्ला हे राजस्थानमधील कोटा लोकसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा विजयी झाले आहेत. त्याआधी त्यांनी राजस्थान विधानसभेत आमदार म्हणून प्रतिनिधित्व केले होते. दरम्यान, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर ओम बिर्ला यांची लोकसभेच्या अध्यक्षपदी निवड झाली होती. सलग दुसऱ्यांदा लोकसभेचं अध्यक्षपद भूषवणारे ओम बिर्ला हे मागच्या काही काळातील पहिलेच अध्यक्ष आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments