माजी मंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषीराज सावंत हा सोमवारी दुपारीपासून बेपत्ता झाला होता. त्यासंदर्भात पुण्यात गुन्हा दाखल झाला. त्यानंतर तो मित्रांसोबत खासगी विमानाने बँकॉकला गेल्याचे स्पष्ट झाले. रात्री ९ वाजेच्या सुमारास तो परत आला. आता या सर्व प्रकरणावर ऋषीराज सावंत याचे बंधू गिरीराज सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
गिरीराज सावंत यांनी सांगितले की, सोमवारी दुपारी ३.३० वाजता ऋषीराजचा मेसेज आला. तो दोन दिवस बाहेर जात असल्याचे म्हटले होते. त्यानंतर त्याने फोन स्विचऑफ केला. आम्हाला तो कुठे गेला? कोणाबरोबर गेला? कशासाठी गेला? त्याची काहीच माहिती नव्हती. वडील या नात्याने तानाजी सांवत चिंताग्रस्त झाले. त्यामुळे गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला. घरात आम्ही रोज कोण कुठे असणार आहे, त्याची माहिती देत असतो. न सांगता कोणीच कुठे जात नाही, असेही गिरीराज सावंत यांनी म्हटले.
दरम्यान ऋषिराज सावंत पुण्यातुन बॅंकॉकला जायला निघाला. मात्र तानाजी सावंतांनी त्यांच्या राजकीय संबंधांचा वापर करुन त्याला परत आणायच ठरवलं . केंद्रीय नागरी उड्डयण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी यामध्ये महत्वाची भुमिका निभावली, अशी माहिती समोर आली आहे.
बॅंकॉकला नाही तर पुन्हा पुण्यातच पोहचलो-
मुरलीधर मोहोळ यांच्या सूचनेनंतर मंत्रालयाकडून तातडीने सुत्रे हलली आणि पायलटला माघारी फीरण्याचे आदेश देण्यात आले. तोपर्यंत बंगालच्या उपसागरावर पोहचलेलं ऋषिराज सावंतचं खाजगी विमानने मग हवेतुनच युटर्न घेतला. विमान जेव्हा लॅंड झालं तेव्हा ऋषिराज सावंत कळालं की, आपण बॅंकॉकला नाही तर पुन्हा पुण्यातच पोहचलो आहोत. दरम्यान, ऋषिराज सावंतसोबत कोण कोण खाजगी विमानानं पुण्याहून बँकॉकसाठी निघालेलं याची माहिती समोर आली आहे. ऋषिराज सावंतसोबत प्रवीण उपाध्याय आणि संदीप वासेकर हे दोन मित्र खाजगी विमानात होते.
यामुळे न सांगता गेला?
आठ दिवसांपूर्वी ऋषीराज दुबईत व्यावसायिक कामासाठी गेला होता. त्यानंतर आता पुन्हा व्यावसायिक कारणासाठी तो बँकॉकला जात होतो. दुबईला आठ दिवस थांबल्यानंतर बँकॉकला कोणी जावू देणार नाही, असे त्याला वाटले. त्यामुळे भीतीपोटी घरात न सांगता तो गेला. मी दोन दिवस बाहेर जात आहे, असे सांगून त्याने फोन बंद केला होता. त्यामुळे आम्ही चिंताग्रस्त झालो होतो, असे गिरीराज सावंत यांनी म्हटले.