समाजमाध्यमातील अनेक उच्चपदस्थ, तसेच सामान्यांची खाती सायबर चोरट्यांकडून हॅक केली जात आहेत.
समाजमाध्यमातील अनेक उच्चपदस्थ, तसेच सामान्यांची खाती सायबर चोरट्यांकडून हॅक केली जात आहेत. पुणे पोलीस दलातील गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांचे समाजमाध्यमातील खाते हॅक करण्यात आल्याचे उघडकीस आले असून, नागरिकांनी हॅक केलेल्या खात्यातील मजकूरास प्रतिसाद देऊ नये, असे आवाहन अतिरिक्त पोलीस आयुक्त पोकळे यांनी केले आहे.
शहरात ऑनलाइन टास्कच्या आमिषाने फसवणुकीच्या घटना वाढत आहेत. समाजमाध्यमात मैत्रीची विनंती पाठवून चोरटे नागरिकांची फसवणूक करतात. सायबर चोरट्यांनी गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त पोकळे यांचे समाजमाध्यमातील खाते हॅक केल्याचा प्रकार उघडकीस आला. पोकळे यांच्या नावाने काही परिचित, नागरिकांनी चोरट्यांनी मैत्रीची विनंती पाठविल्याचे उघडकीस आले आहे. खाते हॅक केल्यानंतर चोरटे संदेश पाठवून नागरिकांची फसवणूक करु शकतात. त्यामुळे चोरट्यांनी पाठविलेल्या संदेशाकडे दुर्लक्ष करावे, असे आवाहन पोकळे यांनी केले आहेत.
गेल्या आठवड्यात शहर पोलीस दलातील एका पोलीस निरीक्षकाच्या नावाने सायबर चोरट्यांनी त्यांच्या पुतणीला संदेश पाठवून फसवणूक केली होती. अशा प्रकाराच्या घटनांमुळे पोलिसांची समाजमाध्यातील खाती सुरक्षित नसल्याचे उघडकीस आले आहे.
सायबर गुन्हे शाखेच्या प्रमुखांचे खाते हॅक
पुणे पोलीस दलातील सायबर गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे प्रमुख आहेत. त्यांचे खाते सायबर चोरट्यांनी हॅक केल्याने पोलीस दलात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.