गेल्या काही दिवसांपासून पुण्यामध्ये महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. भर दिवसा चौकात एका महाविद्यालयीन तरुणीवर कोयत्याने वार केल्यानंतर हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला होता. त्यानंतर आता एक धक्कादायक घटना पुण्यातील कॅम्प परिसरातील एमजी रस्त्यावर घडली आहे. एक २० वर्षीय तरुणी एका कपड्याच्या दुकानात टी-शर्ट खरेदी करण्यासाठी गेली असता तेथील कामगाराने तिच्यासोबत लगट करण्याचा प्रयत्न करून विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार एमजी रस्त्यावर घडला आहे.
लष्कर परिसरातील एमजी रस्ता येथे नाथ चौकातील एका दुकानात टी-शर्ट खरेदी करण्यास गेलेल्या तरुणीचा त्या दुकानातील तरुणाने विनयभंग केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. या तरुणाने टी-शर्ट घेण्यास आलेल्या तरुणीला “आपण तुला टी-शर्ट घालण्यास मदत करतो”, असा बहाणा करत तिच्याशी अश्लील चाळे केले. या प्रकरणी २० वर्षीय पीडित तरुणीने लष्कर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून कैफ करीममुल्ला शेख याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित तरुणी ही २० जुलै रोजी दुपारी सव्वा एकच्या सुमारास त्या दुकानात टी-शर्ट खरेदी करण्यासाठी गेली होती. अनेक टी-शर्ट पाहिल्यानंतर तिला एक टी-शर्ट आवडला. तिने तो घेत अंगावरील पहिल्या टी-शर्ट वरच नवीन टी-शर्ट ट्राय केला. यावेळेस नराधम कैफने तिला टी-शर्ट घालण्याचा बहाणा करून पीडित तरुणीशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. तसेच, तिच्याशी अश्लील चाळे केले. यानंतर घाबरलेल्या तरुणीने लष्कर पोलीस ठाणे गाठत कैफ करीममुल्ला शेख याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. पुढील तपास उपनिरीक्षक एस मोकाटे हे करत आहेत.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पुण्यामध्ये गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. काही दिवसांपूर्वीच एका महाविद्यालयीन तरुणीवर वर्दळीच्या भागात कोयत्याने वार केल्याची घटना घडली होती. त्यानंतर पुणे पोलीस ॲक्शन मोडवर आले होते. मात्र, त्यानंतर देखील या अशा प्रकारच्या घटना घडत असतील तर पुण्यात महिला खरंच सुरक्षित आहेत का असा प्रश्न विचारण्यात येत आहे.