प्रत्येक चित्रपटाच्या संवेदना वेगवेगळ्या असतात. या संवेदना जपणारा, समंजस प्रेक्षक पुण्यात आहे. यामुळेच पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर आमचा आत्मविश्वास वाढला. इतकेच नाही तर आम्ही चित्रपटाच्या माध्यमातून केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांना या महोत्सवात कौतुकाची थाप मिळाली, असे मत महोत्सवात सहभागी झालेल्या चित्रपटांच्या टीमने व्यक्त केले.
लॉ कॉलेज रस्त्यावरील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय येथे आयोजित ‘कँडिड टॉक्स’ या कार्यक्रमाअंतर्गत पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे कलात्मक दिग्दर्शक समर नखाते यांनी आज ‘अ होली कॉन्स्परसी’, ‘काळोखाच्या पारंब्या’ आणि ‘ताठ कणा’ या चित्रपटांच्या टीमशी संवाद साधला त्या वेळी ते बोलत होते. या तीनही चित्रपटांचे वर्ल्ड प्रीमिअर हे पिफ मध्येच झाले, असेही त्यांनी आवर्जून नमूद केले,
‘अ होली कॉन्स्परसी’ चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक सायबल मित्रा, ‘काळोखाच्या पारंब्या’ चित्रपटाच्या कथेचे लेखक भारत ससाणे, कलाकार काजल राऊत, वैभव काळे आणि ‘ताठ कणा’ चित्रपटाचे दिग्दर्शक गिरीश मोहिते आदी या वेळी उपस्थितीत होते. प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक सौमित्र चटोपाध्याय, नसीरूद्दीन शाह यांचा एकत्रित अभिनय असलेला आणि सौमित्र चाटोपाध्याय यांचा हा शेवटचा शेवटचा चित्रपट असल्याचे सांगत सायबल मित्रा म्हणाले, “माझ्या चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमिअर हा पिफ मध्ये झाला. इथल्या प्रेक्षकांना तो आवडलाय ही खात्री झाल्यानंतर आता मी तो इतर महोत्सवांसाठी पाठवेल. पण पिफ मधला प्रदर्शनाने माझा आत्मविश्वास वाढलाय.”
डार्विनचा उत्क्रांतीचा सिद्धांत आणि बायबलमधील सिद्धांत या विषयावर अमेरिकेत स्कूप्स मंकी ट्रायल नावाने एक प्रसिद्ध खटला चालला होता. त्यावर ‘इनहेरीट द विंड’ हे नाटक आले होते. हाच संदर्भ घेत भारतातील बाबींवर आधारित ‘अ होली कॉन्स्परसी’ हा चित्रपट असून मानवी समजूतींचा राजकीय स्वार्थासाठी कशा पद्धतीने वापर केला जातो, यावर भाष्य करण्यात आले आहे. भारताची सर्वच बाबतीतील विविधता व माणुसकी हेच त्याचे खरे सौंदर्य आहे आणि मतदानावरून हे बदलणार नाही, हे दाखविण्याचा प्रयत्न मी केला असल्याचेही मित्रा यांनी नमूद केले.
कोल्ज अप, लॉंग शॉट हेच आमच्या चित्रपटाचे सरगम आहेत असे सांगत, सौमित्र दा आणि नसीरूद्दीन शाह या हाडाच्या अभिनेत्यांना एकत्र काम करताना पाहणे आणि त्यांच्याकडून शिकणे ही सदैव लक्षात राहणारी बाब होती, असे सांगत त्यांनी शुटींग दरम्यानच्या आठवणींना उजाळा दिला.‘डफ’ ही माझी कादंबरी अनेकदा वाचल्यावर मकरंद अनासपुरे यांनी यावर चित्रपट बनविण्याचा निर्णय घेतला असे सांगत भारत ससाणे म्हणाले, “अलिफ या पात्राचा आधात्मिक व भौतिक प्रवास दाखविताना या पात्रातील काळोखाची छटा दाखविणारा हा चित्रपट आहे.”
अलिफ या व्यक्तीरेखेतील निष्पापपणा साकारताना, तो निष्पापपणा ज्या टप्प्यावर संपतो त्या ठिकाणी त्याच्या आयुष्यात काळोख येतो, हे दाखविताना त्याच्यातील तो काळोख दाखविणे माझ्यासाठी आव्हानात्मक होते असे वैभव काळे यांनी सांगितले. चित्रपटात काम करण्याचा माझा पहिलाच अनुभव होता अशी माहिती काजल राऊत यांनी दिली.
ताठ कणा चित्रपटाचे दिग्दर्शक गिरीश मोहिते म्हणाले, “न्यूरो स्पाईन सर्जन असलेले डॉ. पी. एस. रामाणी यांच्या आयुष्यावरील हा बायोपिक असून अनेक नागरीकांना त्यांनी स्पाईन सर्जरीद्वारे दिलेले नवे जीवन चित्रबद्ध करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे.”याद्वारे त्यांचे काम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावे अशी आशा त्यांनी व्यक्त केली.