Wednesday, January 22, 2025
Homeताजी बातमीइर्शाळवाडी घटने मागचं नेमकं कारण..?

इर्शाळवाडी घटने मागचं नेमकं कारण..?

इर्शाळवाडीत दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत अख्खं गाव जवळपास ढिगाऱ्याखाली गेलं आहे. अनेक जण बेपत्ता आहेत. आज दुसऱ्या दिवशीही मदत आणि बचावकार्य सुरू आहे. तर या घटने मागचं नेमकं कारण? काय समोर आलं आहे.

रायगडमधील इर्शाळवाडी येथे घडलेल्या दरडीच्या घटनेमागे कमी कालावधीत झालेली अतिवृष्टी कारणीभूत असल्याचा प्राथमिक निष्कर्ष पुण्यातील ‘सेंटर फॉर सिटीझन सायन्स’च्या (सीसीएस) ‘सतर्क’ यंत्रणेने काढला आहे. इर्शाळगडाच्या जवळच असलेल्या माथेरान येथे १८ ते २० जुलै या ७२ तासांमध्ये तब्बल ९१० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. मोठ्या पावसासोबत तीव्र डोंगरउतारावरील मातीची खोली यांमुळे ‘मडफ्लो’ प्रकारची दरड कोसळल्याचे ‘सतर्क’ने म्हटले आहे.

रायगड, पुणे, सातारा आणि रत्नागिरीच्या घाट क्षेत्रामध्ये गेले तीन दिवस मुसळधार पाऊस सुरू होता. १८ आणि १९ जुलैला कर्जत ते लोणावळा या भागांत अनेक ठिकाणी ४५० मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस नोंदला गेला. त्यापुढील ४८ तासांमध्ये पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असल्याने ‘सतर्क’तर्फे या भागामध्ये दरड कोसळण्याची शक्यता अधिक असल्याची सूचना बुधवारी संध्याकाळी (१९ जुलै) जारी करण्यात आली होती.

‘सीसीएस’चे उपाध्यक्ष आणि ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी म्हणाले, ‘इर्शाळवाडीच्या थेट वरील बाजूस, डोंगर उतारावर असणारी झाडी लक्षात घेता तिथे मातीची खोली जास्त असल्याचे स्पष्ट होते. त्याचसोबत वाडीच्या वरील बाजूस डोंगराच्या वळीतून (हॉलो) झराही वाहत असल्याची माहिती मिळत आहे. ही स्थिती गाव दरडप्रवण असल्याचे सूचित करते. याच्या जोडीला जवळच असलेल्या माथेरान येथे ७२ तासांत ९१० मिलिमीटर पाऊस नोंदला गेला. दरडप्रवण गावावर कमी वेळात अतिवृष्टी झाल्याने माळीण, तळीयेसारखी ‘मडफ्लो’ प्रकारची दरड कोसळली.’

‘मडफ्लोसारख्या घटनांसाठी ठराविक दिवसांमध्ये पावसाचे विशिष्ट प्रमाण आवश्यक असते. ‘सतर्क’तर्फे सह्याद्रीमधील विविध दरडप्रवण क्षेत्रांमध्ये दरड कोसळण्यासाठी आवश्यक पावसाचे प्रमाण निश्चित करण्यात आले आहे. दरडप्रवण गावे सॅटेलाइट इमेजच्या साह्याने शोधून काढणे शक्य आहे. मोठ्या पावसाच्या काळात अशा गावांना सातत्याने पूर्वसूचना देऊन त्यांचे तात्पुरते स्थलांतर करून जीवितहानी टाळता येऊ शकते. प्रशासनासोबत समन्वयातूनच ते शक्य होईल. त्यासाठी प्रशासनाने ‘सतर्क’ला सहकार्य करावे,’ असे आवाहन डॉ. कुलकर्णी यांनी केले.

अतिवृष्टीमुळे कोसळलेल्या दरडी

सह्याद्रीमध्ये यापूर्वी घडलेल्या दरडींच्या काही घटना आणि तेव्हा जवळच्या पर्जन्यमापकावर नोंदला गेलेला पाऊस :

१. माळीण- ३० जुलै २०१४ – पाच दिवसांमध्ये ७०० मिमी

२ . तळीये- २१ जुलै २०२१- सहा दिवसांमध्ये १५०० मिमी

३ . ढोकावळे २१ जुलै २०२१- तीन दिवसांमध्ये ६०० मिमी

४ . पोसरे- २१ जुलै २०२१- पाच दिवसांमध्ये किमान ९०० मिमी

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments