Wednesday, May 14, 2025
Homeअर्थविश्वचिखली पोलीसांची तत्परता; रिक्षामध्ये विसरलेली साडेसात तोळ्यांची सोन्याची बॅग महिलेपर्यंत सुखरूप पोहोचवली

चिखली पोलीसांची तत्परता; रिक्षामध्ये विसरलेली साडेसात तोळ्यांची सोन्याची बॅग महिलेपर्यंत सुखरूप पोहोचवली

चिखली येथील एका महिलेकडून रिक्षामध्ये विसरलेली ६,७५,०००/- रुपये किमतीची साडेसात तोळ्यांची सोन्याची बॅग अतिशय प्रामाणिकपणे आणि चोख शोधकार्याच्या माध्यमातून पोलीसांच्या मदतीने परत करण्यात आली. ही कौतुकास्पद कामगिरी चिखली पोलीस स्टेशनच्या डी.बी. पथकाने पार पाडली.

ही घटना दिनांक ११ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी घडली. प्रतिभा प्रविण काळे (वय ३५ वर्षे, रा. जयहिंद रेसीडेन्सी, नेवाळेवस्ती, चिखली, पुणे) या कामानिमित्त चिखली गाव कमान येथे जाण्यासाठी एका रिक्षामधून (MH 14 JC 4339) प्रवास करत होत्या. त्यांनी ६.७५ लाख रुपये किमतीचे साडेसात तोळ्यांचे सोन्याचे गंठण बॅगमध्ये ठेवले होते. ही बॅग त्यांनी रिक्षामधील सिटच्या मागे ठेवली होती. मात्र, उतरताना त्या बॅग रिक्षामध्येच विसरून गेल्या.

घटनेनंतर तात्काळ त्यांनी चिखली पोलीस स्टेशन गाठले. रिक्षाचा नंबर माहित नसल्यामुळे शोध घेणे आव्हानात्मक होते. मात्र, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंखे यांच्या सूचनेनुसार व मार्गदर्शनाखाली डी.बी. पथकाचे प्रभारी अधिकारी राम गोमारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तात्काळ तपास सुरू केला.

पो. हवालदार विनोद व्होनमाने, अमर कांबळे, कबीर पिंजारी, संतोष भोर आणि नारायण सोमवंशी यांनी मिळून घटनास्थळ आणि परिसरातील जवळपास २० सीसीटीव्ही फुटेज तपासले. या माध्यमातून संबंधित रिक्षाचा क्रमांक शोधण्यात यश आले. त्यानंतर रिक्षा चालक बाळु जाधव (रा. चिखली) यांच्याशी संपर्क साधण्यात आला. त्यांनी सदर बॅग सुरक्षित ठेवली असल्याची माहिती दिली आणि ती पोलीसांच्या ताब्यात दिली.

पोलीसांनी ही बॅग पुन्हा प्रतिभा काळे यांच्याकडे सुपूर्द केली. तसेच प्रामाणिकपणाबद्दल रिक्षाचालक बाळु जाधव यांचा चिखली पोलीस स्टेशन येथे सत्कार करण्यात आला.

ही संपूर्ण कामगिरी पोलीस उपआयुक्त शिवाजी पवार (परिमंडळ ३), सहा. पोलीस आयुक्त अनिल कोळी (भोसरी विभाग), वरीष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंखे व पोलीस निरीक्षक (गुन्हे) अमोल फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments