Tuesday, January 13, 2026
Homeआरोग्यविषयकआजपासून महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

आजपासून महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ साठी उमेदवारांच्या नामनिर्देशन पत्रे दाखल करण्याची प्रक्रिया आज, मंगळवार दि. २३ डिसेंबर २०२५ पासून अधिकृतपणे सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवारांना सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत आपली नामनिर्देशन पत्रे दाखल करता येणार आहेत, अशी माहिती आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांनी दिली.

निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, सुलभ आणि नियमानुसार पार पडावी यासाठी महापालिकेच्या आठही क्षेत्रीय कार्यालयांमध्ये स्वतंत्र निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालये कार्यरत करण्यात आली आहेत. संबंधित क्षेत्रीय कार्यालयांमध्ये प्रभागनिहाय नामनिर्देशन पत्रे ऑफलाईन पद्धतीने दि. ३० डिसेंबर २०२५ पर्यंत स्वीकारली जाणार आहेत. अंतिम दिवशी सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्रे स्वीकारण्यात येणार आहेत.

प्राप्त नामनिर्देशन पत्रांची छाननी दि. ३१ डिसेंबर २०२५ रोजी करण्यात येणार असून उमेदवारी माघारी घेण्याची अंतिम तारीख दि. २ जानेवारी २०२६ निश्चित करण्यात आली आहे. अंतिम उमेदवार यादी आणि निवडणूक चिन्हांचे वाटप दि. ३ जानेवारी २०२६ रोजी जाहीर होणार आहे. महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी दि. १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून, दि. १६ जानेवारी २०२६ रोजी मतमोजणी होणार आहे.

नामनिर्देशन पत्रे दाखल करताना उमेदवारांनी निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार आवश्यक कागदपत्रे, प्रतिज्ञापत्रे तसेच अनिवार्य शुल्क वेळेत सादर करणे बंधनकारक आहे. नियमांचे उल्लंघन अथवा त्रुटी आढळल्यास संबंधित उमेदवारी बाद होऊ शकते, याची उमेदवारांनी विशेष नोंद घ्यावी, असे आवाहन महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आजपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात हालचालींना वेग आला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments